खामगाव |प्रतिभा जगदने
चारित्र्याच्या संशयातून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला. ‘तुझे कोणासोबत लफडे आहे’ असा संशय घेत पतीने पत्नीशी वाद घातला. हा वाद इतका टोकाला गेला की, पतीने घरातच असलेल्या बेस्ट बॉलच्या स्टिकने पत्नीच्या डोक्यावर, पोटावर आणि पाठीवर बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत पत्नीला उपचारासाठी प्रथम खामगाव आणि त्यानंतर अकोला येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ३० ऑगस्टच्या रात्री गोपाळ नगर परिसरातील घरकुल भागात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तीन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे.
गोपाळ नगर परिसरातील घरकुलात गणेश महादेव डाबेराव आणि त्यांची पत्नी लक्ष्मी हे गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पोलिस तक्रारीनुसार, गणेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. या कारणावरून पती-पत्नीमध्ये यापूर्वीही वाद होत होते. मात्र, वाद झाल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र राहत असल्याचे सांगण्यात आले आहे.
३० ऑगस्टच्या रात्री पुन्हा याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. ‘तुझे कोणासोबत लफडे आहे’ असे म्हणत गणेशने पत्नी लक्ष्मी हिच्याशी भांडण सुरू केले. वाद वाढल्यानंतर त्याने घरात असलेल्या बेस्ट बॉलच्या स्टिकने लक्ष्मीच्या डोक्यावर, पोटावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत लक्ष्मी घरातच बेशुद्ध पडली.
घरातून आरडाओरड ऐकू आल्यानंतर शेजारी राहणारे रोहन देविदास घोडाम घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी लक्ष्मी गंभीर अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिला उपचारासाठी प्रथम खामगाव येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंदार पुरी यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी शेजारी राहणारे रोहन देविदास घोडाम यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश महादेव डाबेराव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
मृत लक्ष्मी यांच्या पश्चात चार वर्षांची एक मुलगी आणि तिच्यापेक्षा लहान दोन मुले आहेत. चारित्र्याच्या संशयातून सुरू झालेल्या वादाचा शेवट पत्नीच्या मृत्यूत झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन लहान मुलांनी आई गमावल्याने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे. तपासातून घटनेमागील संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
📲 खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा
खामगाव, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, गुन्हेगारी, शेती, हवामान, सरकारी योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या कट्टा न्यूज च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
📌 ही महत्त्वाची बातमी शेअर करा
खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही बातमी WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा.
📰 Related News
- म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव
- अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त
- बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचे पैसे थेट खात्यात जमा होणार; 10.78 कोटींचा निधी मंजूर










