स्वातंत्र्यदिनी सकाळी उपकेंद्रात राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर काही तासांतच समुदाय आरोग्य अधिकाऱ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मेहकर तालुक्यातील गोहोगाव हाडे येथे घडली. देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. संदीप प्रकाशराव हाडे यांनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या गावी आत्महत्या केली. दरम्यान, काही दिवसांवर आलेले NQAS मूल्यांकन, कामाचा वाढता ताण आणि वरिष्ठांकडून सोपविलेल्या जबाबदाऱ्यांचा दबाव यामुळे ते मानसिक तणावात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे.
डॉ. संदीप हाडे यांची बाहेर जिल्ह्यातून बदली होऊन मांडवा फॉरेस्ट येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मागील सुमारे चार महिन्यांपासून ते तेथे कर्तव्य बजावत होते. उपकेंद्रात मनुष्यबळ, साधनसामुग्री आणि आवश्यक सुविधांचा अभाव असताना विविध शासकीय कामे आणि NQAS मूल्यांकनाची तयारी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, असा दावा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, NQAS म्हणजेच National Quality Assurance Standards अंतर्गत उपकेंद्रातील सुविधा आणि कामकाजाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती येणार होती. हे मूल्यांकन अवघ्या चार ते पाच दिवसांवर आले होते. उपलब्ध मनुष्यबळ आणि सुविधांच्या मर्यादेत कमी कालावधीत आवश्यक निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने डॉ. हाडे यांच्यावर मानसिक आणि प्रशासकीय दबाव वाढला होता, असा आरोप संघटनेने केला आहे.
डॉ. हाडे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीय आणि परिचितांकडूनही या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि कौटुंबिक कलह नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय होते, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणत्या स्वरूपाच्या सूचना आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या, तसेच NQAS मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर नेमका किती दबाव होता, याची सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
या प्रकरणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडेही निवेदन देण्यात आले असून, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, डॉ. संदीप हाडे हे १५ ऑगस्ट रोजी आपल्या मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रात ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी सुमारे ११ वाजता त्यांनी देऊळगाव साकर्शा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. अनिकेत राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संदीप हाडे राजीनामा घेऊन त्यांच्याकडे आले होते. राजीनाम्यामध्ये “माझे मानसिक स्वास्थ्य सध्या ठीक नसल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी नमूद केले होते. त्यावेळी डॉ. राठोड यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि कामाचा किंवा अन्य कोणताही ताण घेऊ नका, असे सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
मात्र, त्यानंतर डॉ. संदीप हाडे यांनी आपल्या गावी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेने त्यांच्या सहकाऱ्यांसह आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी मेहकर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या घटनेबाबत चर्चा केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची फास्ट ट्रॅक चौकशी करण्याची मागणी केली. बाहेर जिल्ह्यातील चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, चार ते पाच दिवसांत न्याय मिळाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने दिला आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांनाही निवेदन देऊन या प्रकरणात न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात NQAS मूल्यांकन, कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा डॉ. संदीप हाडे यांच्या आत्महत्येशी नेमका संबंध होता का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, आत्महत्येचे कारण म्हणून NQASचा दबाव अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाही. संघटनेने केलेले आरोप, डॉ. हाडे यांनी दिलेला राजीनामा आणि संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे या सर्व बाबींची चौकशी झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
📲 KattaNews WhatsApp ग्रुप जॉइन करा
बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा.













