sindkhed raja to shegaon bhaktimarg : जिल्ह्यातील प्रस्तावित भक्तिमार्गाला अखेर ‘ब्रेक’ लागला आहे. या महामार्गामुळे हजारो हेक्टर शेतजमीन बाधित होऊन शेतकरी भूमिहीन होणार होते. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांकडून होणारा विरोध पाहता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत हा महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या माध्यमातून लढा चालविला होता. आता सिंदखेड राजा ते शेगाव हा प्रस्तावित १०९ किलोमीटरचा भक्तिमार्ग राज्य शासनाने रद्द केला आहे. लोकभावना पाहता चिखलीतील लोकप्रतिनिधींनीही यासंदर्भात पाठपुरावा केला होता. याबाबतचा शासनादेश १४ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. रस्त्यासाठी ४७ गावात भूसंपादन होणार होते.
असा होता भक्तिमार्ग
माँ जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा व संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे समाधीस्थळ शेगाव या दोन पर्यटन स्थळांना जोडणारा व समृद्धी महामार्गाला संलग्न सुमारे १०९ किमीचा व पाच तालुक्यांतून हा महामार्ग जाणार होता. समृद्धीच्या धर्तीवर हा ‘ग्रीनफील्ड’ महामार्ग ऐतिहासिक व धार्मिक केंद्राशी जोडला जाणार होता. त्यास ‘भक्त्तिमार्ग’ असे नाव देण्यात आले होते.