सिंदखेडराजा | प्रा.दिलीप नाईकवाड
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, लघु व पाझर तलावांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे.
महसूल विभागाच्या माहितीनुसार, तालुक्यात काल सरासरी ९८.०१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक १२५.५० मिमी पाऊस झाला. साखरखेर्डा मंडळात ११८.०५ मिमी, मलकापूर पांग्रा येथे ९७.०८ मिमी, सिंदखेडराजा येथे ९१.०५ मिमी, दुसरबीड येथे ८९.०८ मिमी, सोनोशी येथे ८३ मिमी तर किनगाव राजा येथे ७२.०३ मिमी पावसाची नोंद झाली.
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर साखरखेर्डा येथील भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली. सवडद येथील कोराडी नदीलाही पूर आला असून, कोराडी धरणातील पाणीसाठा सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले ओढे-नाले पुन्हा खळाळून वाहू लागल्याने परिसरातील जलस्रोतांना मोठा फायदा झाला आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी विहिरींना पाणी लागल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील भूजल पातळीत वाढ होण्यास या पावसाची मदत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. साखरखेर्डा–मेरा बु. मार्गावरील शिंदी गावाजवळ रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आणि मका आदी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांना आवश्यक पाणी मिळाल्याने त्यांची वाढ जोमाने होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मात्र, हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज वर्तविल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदी, नाले आणि धरण परिसरात पाण्याची पातळी वाढल्यास नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
संबंधित बातमी
बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक बातम्या, हवामान अपडेट्स, शेतीविषयक माहिती आणि सरकारी योजनांच्या ताज्या माहितीसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.











