शिवाजी विद्यालय भर जहागीर येथे जिल्हास्तरीय मूल्यांकन संपन्न.

 

 

नारायणराव आरु पाटील /प्रतिनिधी

 

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजनेअंतर्गत शिवाजी शिक्षण संस्था वाशिम द्वारे संचलित शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भर जहागीर ने तालुक्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत दुसऱ्या वर्षी सुद्धा आपला तालुकास्तरीय शैक्षणिक क्षेत्रातील दबदबा कायम ठेवला. माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 शासनाच्या या महत्त्वाकांक्षी व दूरदृष्टीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून भर जहागीर रिसोड तालुक्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी पार पाडली.

 

 

यामुळे तालुकास्तरीय मूल्यमापनाच्या नंतर लगेचच शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने शिक्षण अधिकारी राजेंद्रजी शिंदे व त्यांच्या चमूने भर जहागीर विद्यालयांमध्ये येऊन जिल्हास्तरीय मूल्यांकन केले. यावेळी जिल्हास्तरीय चमूचे एम.सी.सी. ग्रुपने व विद्यार्थी वर्गाने अभूतपूर्व असे स्वागत केले. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -2 या योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची चमुने प्रत्यक्ष पाहणी केली.

 

 

कार्यालयीन दस्तऐवजाची छाननी केली. मूल्यांकन चमुने प्रत्यक्ष कार्यालय,वर्गामध्ये जाऊन वर्गखोल्या, फर्निचर, शैक्षणिक क्षमता चाचणी, अध्ययन निष्पत्ती, उपस्थिती, भाषण क्षमता,वाचन क्षमता, लेखन क्षमता, गणितीय क्रिया आनंददायी शनिवार उपक्रम, भौतिक सुविधांची पूर्तता शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व सवलतींची लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याकरता केलेले कार्य, मतदान प्रचार व प्रसार साक्षरता अभियानातील सहभाग, महावाचन उत्सव २०२४ मधील सहभाग या सर्व बाबींची मूल्यांकन चमूने काळजीपूर्वक व काटेकोरपणे तपासणी केली.

 

 

शासनाच्या ६ सप्टेंबर च्या शासन निर्णया नुसार शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मागील वर्षी तालुक्यातून सर्वप्रथम आल्यामुळे विद्यालयास यावर्षी तालुकास्तरातील प्रथम किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी स्पर्धेत उतरता येणार नाही यामुळे रिसोड तालुक्यातून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यालयास जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करणे गरजेचे आहे शिवाजी शिक्षण संस्था वाशिम द्वारे चालविल्या जाणाऱ्या या विद्यालयांमध्ये नेहमीच विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग नोंदविल्या जातो.

 

 

शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून या विद्यालयांमध्ये नेहमीच शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी तत्पर असतात. विद्यालयास पालकांचे नेहमी सहकार्य लाभते लोकवर्गणीतून अनेक बाबींची विद्यालयात पूर्तता करण्यात आलेली आहे.भौतिक दृष्ट्या सुसंपन्न असणाऱ्या व शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या या विद्यालयाचा प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे. प्राचार्य बी.जी.काळे यांच्या मार्गदर्शनात विद्यालयातील सर्व कर्मचारी विद्यालयाच्या प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध असतात.

 

 

विद्यालयाची सुंदर रंगरंगोटी व शासनाच्या ध्येय धोरणानुसार आनंददायी शिक्षण पद्धती राबविण्यासाठी भिंतीवर साकारलेली चित्रे यावेळेस सर्वांच्या आकर्षणाची केंद्रे ठरलेली आहेत.