साखरखेर्डा (वार्ताहर) | ८ मार्च २०२६
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे तब्बल 60 किमी अंतर पार करावे लागते. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उपक्रम सुरू केला असून त्याचा पहिला टप्पा साखरखेर्डा येथून सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांची कामे एकाच छताखाली व्हावीत हा शासनाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अजित दिवटे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
याशिवाय ॲग्रिस्टॅक आणि पीएम किसान नोंदणी बाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने 13 शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी आवश्यक दाखलेही देण्यात आले.
यावेळी युवासेना नेते योगेश जाधव म्हणाले की, 2022-23 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकारच्या शिबिराची सुरुवात केली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे जलदगतीने होण्यास मदत झाली. त्याच धर्तीवर आता छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात आले असून यामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.
साखरखेर्डा येथे अप्पर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित असून ते सुरू झाल्यानंतर नागरिकांना सिंदखेडराजा येथे जाण्याची गरज भासणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, या शिबिरात महसूल विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित असताना पंचायत समितीचे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता व भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याची नोंद घेण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल मंडळाधिकारी रघुनाथ सोळंके, ग्राम महसूल अधिकारी संजय शिंगणे, प्रशांत पोंधे, लखन राजपूत, गिऱ्हे, कृषी अधिकारी गणेश बंगाळे, छबुलाल कोल्हे तसेच महसूल कर्मचारी संजय सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल अधिकारी शिवानंदन वाकदकर यांनी केले.
Related News :
दारूड्या भावाच्या मित्राला “घरी जा” म्हटल्याने वाद; लहान भावाने चाकूने भोसकून मोठ्या भावाचा खून
हे आवश्यक करा:
अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.










