सभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना न होता काही मोजक्या घटकांनाच होणार असल्याचा आरोप सदस्यांनी केला. शहराच्या सर्वांगीण विकासाऐवजी दिशाभूल करणारा आणि जनहिताला मारक असा हा अर्थसंकल्प असल्याचे मत स्थायी समिती सदस्यांनी नोंदवले.
सभेदरम्यान वातावरण चांगलेच तापले होते. नगराध्यक्षांनी सदस्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र सदस्यांनी प्रतिसाद न देता प्रस्ताव ठामपणे नामंजूर केला. नगरपरिषद उपाध्यक्ष वैशाली सुळ यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्यांनी उघडपणे विरोध दर्शवल्याने नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सदस्यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून नगराध्यक्ष सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा तसेच आर्थिक निर्णयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.
शेगाव नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समितीत अर्थसंकल्प नामंजूर झाल्याने प्रशासनात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुधारित अर्थसंकल्प सादर केला जाणार की राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या घडामोडी आगामी काळातील शेगावच्या राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
🔎 हे पण वाचा..












