Robbery latest news : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी antarwali sarati येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन घरे फोडून दागिन्यांसह दोन लाखांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. चोरीची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी गोंदी पोलिसांनी पंचनामा केला आहे. अंतरवाली सराटी येथे सोमवारी रात्री व्दारकाबाई संतोष भुजबळ या वयोवृद्ध महिला दोन नाती व एका नातवासह गावात राहतात. व्दारकाबाई या नातेवाइकांना भेटायला गेल्याने लग्न झालेली नात सध्या माहेरी आली होती.
एक लहान नात घरात होती. आजी गावाला गेल्याने दोन्ही नाती गावातच आपल्या आत्याकडे झोपायला गेल्या होत्या. झोपायला जाताना लग्न झालेल्या मुलीने आपल्या गळ्यातील नेकलेस, एक तोळ्याचे कानातले झुंबर, आठ ग्रॅमचे झुंबर असे ‘दागिने’ पर्समध्ये ठेवले होते. ती पर्स एका पिशवीत ठेवून ही पिशवी घरातील पेटीत ठेवली होती. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुणी नसल्याची संधी साधून घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पेटीचे कुलूप तोडून पिशवीत ठेवलेले दागिने लंपास केले.
विशेष म्हणजे नकली दागिन्यांना हात न लावता पेटीतील सामान अस्ताव्यस्त केले. तसेच एक पेटी जवळच्या मोसंबीच्या बागात नेऊन फोडली. तिच्यात काही सापडले नसल्याने ती तेथेच टाकून पळ काढला. द्वारकाबाई यांच्याशेजारी राहणारे अशोक काळे यांच्या खळ्यातील गायदेखील चोरून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे उघड झाले. यानंतर चोरांनी महेश आदलिंगे यांच्या किचनचे कुलूप तोडून पँटच्या खिशात असलेले सात हजार रुपये लांबवले.
चौर पसार
तसेच रवींद्र घाडगे यांच्या घरातदेखील चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना कुत्रा भुंकल्याने चोरटे पसार झाले. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याचे मंगळवारी उघड झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक किरण हवाळे, जमादार जी. जे. दिलवाले यांनी पंचनामा केला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.