वाशिम |११ फेब्रुवारी २०२६
रिठद (वाशीम) : रिठद गावातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी चुकीच्या वेळेत दिल्या जाणाऱ्या विजेला विरोध करत
दिवसाच्या वेळेत वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी विद्युत उपकेंद्रात ठिय्या आंदोलन केले.
शेतकरी, वीजपुरवठा आणि MSEDCL संदर्भातील हा प्रश्न सध्या ग्रामीण भागात गंभीर बनला असून या घटनेने विशेष लक्ष वेधले आहे.
दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता रिठद गावातील जवळपास
१५० हून अधिक शेतकरी एकत्र येत थेट रिठद विद्युत उपकेंद्राकडे गेले.
रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत दिल्या जाणाऱ्या विजेमुळे शेतीची कामे करणे अवघड होत असल्याचे
शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.
शेतकऱ्यांच्या मते बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मोटरपंप
फक्त दोन ते तीन तासच चालतो.
पिकांची वाढ झाल्याने रात्रीच्या अंधारात पाईप बदलणे,
मोटर सांभाळणे धोकादायक ठरत असून त्यामुळे दिवसा शेतीसाठी वीज मिळणे अत्यावश्यक असल्याचे
शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान नमूद केले.
या आंदोलनाची माहिती रिठदचे कनिष्ठ अभियंता जाधव यांनी
उपविभागीय अभियंता रिसोड तसेच
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वाशीम यांना दिली.
मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळेत बदलास दुजोरा न मिळाल्याने
तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून
कनिष्ठ अभियंता जाधव यांनी सामंजस्याची भूमिका घेत
सकाळी पाच ते दुपारी एक या वेळेत शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर मांडला.
फिडर ओव्हरलोड झाल्यास तात्पुरता फिडर बंद करण्यात येईल
आणि विद्युत दाब सुरळीत झाल्यावर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल,
या अटीवर शेतकऱ्यांनी प्रस्ताव सर्वानुमते मान्य केला.
हे पण वाचा.
रिठद शिवारात चोरांचा सुळसुळाट! स्प्रिंकलर तोट्यांची चोरी; पोलिस तपासावर शेतकऱ्यांचा संताप
या घटनेची माहिती वाशीम ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.
त्यामुळे दोन पोलीस जीप घटनास्थळी दाखल झाल्या.
पीएसआय मवाळ, जमादार घाटे, कुंबरे साहेब तसेच वाहनचालक उस्मान
यांनी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.
हे पण वाचा..
नाथ समाजाच्या मूर्तीची विटंबना प्रकरणी निवेदन; दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी
कनिष्ठ अभियंता जाधव यांनी दाखवलेल्या सामंजस्यपूर्ण भूमिकेमुळे
शेतकरी समाधानी झाले असून दिलेल्या वेळेत
शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
👉 अशाच ग्रामीण, शेतकरी आणि प्रशासनाशी संबंधित ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in वाचत रहा.










