चिखली |विशाल गवई
गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाही, नंबर लागत नाही, किंवा एजन्सीकडून उडवाउडवीची उत्तरं मिळतात हा अनुभव चिखली तालुक्यातील मौजे रायपूर परिसरातील नागरिकांसाठी नवा नाही. आता याच भागातील भारत गॅस एजन्सीवर थेट काळाबाजाराचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते राहुल रामदास वरवंडे यांनी तहसीलदार, चिखली यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. कारवाई न झाल्यास थेट आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
तक्रारीतील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे धमकीचा आरोप. रायपूर येथील एका किरकोळ गॅस वितरकाकडून आपल्याला धमकी देण्यात आल्याचे वरवंडे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर त्याला थेट धमकी मिळणे, ही बाब प्रशासनाच्या गांभीर्याचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा करते. अशा धमक्यांकडे दुर्लक्ष झाले, तर तक्रार करणाऱ्या नागरिकांचा प्रशासनावरील विश्वासच कमी होतो.
याशिवाय, हे प्रकरण फक्त रायपूरपुरतेच मर्यादित नाही. चिखली शहरातील सैलानी नगर परिसरातही अवैध गॅस साठा असल्याचा आरोप वरवंडे यांनी केला आहे. येथील एक किरकोळ गॅस विक्रेता कोणत्याही अडथळ्याशिवाय आपला व्यवसाय सुरळीत चालवत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आणि यावरही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणजेच एकाच वेळी दोन ठिकाणी रायपूर आणि सैलानी नगर गॅस वितरणातील अनियमिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वरवंडे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. जर तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही, तर दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असे त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. आमरण उपोषणासारखे पाऊल हे शेवटचे शस्त्र मानले जाते, आणि ते उचलण्याची वेळ यावी, यातूनच प्रशासकीय दिरंगाईची तीव्रता लक्षात येते.
गॅस एजन्सी काळाबाजार हा प्रश्न फक्त कागदी तक्रारींपुरता मर्यादित राहू नये, ही सर्वसामान्य ग्राहकांचीही अपेक्षा आहे. योग्य वेळी सिलिंडर मिळणे हा प्रत्येक कुटुंबाचा हक्क आहे, आणि तो हक्क डावलला जात असेल तर प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. आता रायपूर येथील भारत गॅस एजन्सीविरोधातील या तक्रारीवर तहसील प्रशासन काय भूमिका घेते, आणि ३० सप्टेंबरपूर्वी काही ठोस कारवाई होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तुमच्या परिसरातही गॅस वितरणात अशा प्रकारची अनियमितता किंवा काळाबाजार होत असल्याचे तुमच्या निदर्शनास आले असेल, तर याबाबतची माहिती आमच्यासोबत नक्की शेअर करा. आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि चिखली तालुक्यातील अशा महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळवा.
संबंधित बातम्या
- राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांचा मोठा दावा; “जनतेने दोनदा घरी बसवलेल्या व्यक्तीला घेऊन काय फायदा? भाजपने अधिकृत तारीखच दिली नव्हती!”
- फक्त कॉलिंग-SMS रिचार्ज हवाय? TRAI च्या नव्या निर्णयाने मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा
- शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी










