parbhani news : परभणी जिल्ह्यातील वसमत शहरातील विद्यानगर भागात शिक्षणासाठी राहात असलेल्या दीपिका खंदारे (वय १७, रा. आहेरवाडी, ता. पूर्णा, जि. परभणी) या विद्यार्थिनीने नीट परीक्षेच्या तणावातून घराच्या छतास असलेल्या लोखंडी हुकला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना रविवारच्या रात्री घडली. याप्रकरणी शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपिका ही बारावी उत्तीर्ण आहे. ती नीट परीक्षेची तयारी करीत होती. परंतु, तिला यामध्ये ताणतणाव अधिकच येत होता. याच ताणतणावातून तिने रविवारी मध्यरात्री घराच्या छतास असलेल्या लोखंडी हुकेला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी पहाटे घरच्यांच्या लक्षात आला. यानंतर नातेवाइकांनी पोलिसांना ही माहिती दिली.
यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, जमादार शेख हकीम यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सदाशिव खंदारे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.