
Uddhav thackeray latest news : लोकसभा निकालानंतर पहिल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह बाजूला ठेवून शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता निवडणुकीला सामारे जा, नाहीतर विजेते म्हणून फिरू नका, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेसेनेला दिले.
उद्धवसेनेच्या वतीने ५८ वा वर्धापनदिन माटुंगा येथील ‘षण्मुखानंद सभागृहात’ साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे यांनी लोकसभेचा निकाल व आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेनेवर टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शहरी नक्षलवादाच्या टीकेवर बोलताना सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडणे, नते यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना संपवणे हा शासकीय नक्षलवाद आहे, असे प्रत्युत्तर दिले. लोकशाही वाचवण्यासाठी लढणे हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे, असा टोला लगावतानाच माझ्या वडिलांचा फोटो चोरता व स्ट्राइक रेट कसला सांगता, असा सवालही त्यांनी केला.
काहींचा बिनशर्ट पाठिंबा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. राज यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचा उल्लेख करताना काहींनी बिनशर्ट पाठिंबा दिला असे वक्तव्य करताच शिवसैनिकांमध्ये हशा पिकला. त्यावेळी उघड उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा असल्याची कोटी त्यांनी केली.
‘मोदींनी आतापासूनच प्रचार सुरू करावा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी pm narendra modi यांनाही उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले. मोदींना मी आमंत्रण देतोय, विधानसभेचा प्रचार आतापासून सुरू करा. माझ्या वडिलांऐवजी शिंदेंच्या वडिलांचा फोटो लावा व प्रचार करा, मग मी आहे व तुम्ही आहात, असे ते म्हणाले.