अकोला/प्रतिनिधी
येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत OBC उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले नाही तर निवडणुकीनंतर ओबीसींच्या आरक्षणाला धोका निर्माण होईल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे केले. अकोला येथे धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवार, दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव पातोंड गुरुजी होते. यावेळी अॅड. आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी १९९० मध्ये आरक्षणाची शिडी तयार केली. या शिडीमुळे समाजातील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होत आहेत. नोकऱ्यांवर लागत आहेत. आरक्षणाची शिडी नसती तर कोणी पुढे गेलेच नसते. तुमच्या मुलांचे आयुष्य सुखरूप, सुरक्षित करायचे असेल आरक्षण वाचवलं पाहिजे.
निवडणुकीनंतर विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभे राहणारे सदस्य परेशा संख्येने सभागृहात नसतील तर आरक्षणाला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा धोका लक्षात घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोठ्या संख्येने विधानसभेत पाठवावे लागेल. असे आंबेडकर म्हणाले.