
महिलांच्या खात्यात “लाडकी बहीण योजना” चे पैसे जमा झाल्यानंतर विरोधकांना धडकी भरली आहे. सरकार दीड हजारावरच थांबणार नाही तर आर्थिक स्थिती मजबूत होईल, त्यानुसार दीडचे तीन हजारही देईल. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. महिला अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू करतील. विकासाच्या दृष्टीने योजना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लाडक्या बहिणींनी विरोधकांना सातारचे कंदी पेढे देऊन विरोधाचा वेडेपणा सोडण्यास सांगावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक महिलांची दिशाभूल करत आहेत. ही योजना म्हणजे चुनावी जुमला आहे. मतदानासाठी ही योजना लाच असल्याचेही ते म्हणतात. न्यायालयात जाऊन योजनेला खोडा घालण्याचाही प्रयत्न झाला. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना गरीब बहिणींची परिस्थिती काय कळणार, असा टोला हाणत बहिणींबद्दल बोलताना विरोधकांना मनाची नाही तर जनाची लाज वाटली पाहिजे. योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला.
तीन कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला कर्ज घेतात अन् वेळेत परत करतात. या पैशातून महिला उद्योग करतील व अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
१७ ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करणार आहे. महिलांच्या सन्मानासाठी असणारी लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायमस्वरूपी राहणार आहे. महायुती सरकारला आशीर्वाद मिळाला तर या रकमेमध्ये तीन हजारांपर्यंत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील महिला भगिनींना दिली.
सैनिक स्कूलच्या मैदानावर रविवारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोज होते. यावेळी ते बोलत होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आदी यावेळी उपस्थित होते.