मेहकर |माधव भांदुर्गे
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात गांजाच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मेहकर पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी गौंडाळा शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली सापळा रचून सात जणांना गांजासह ताब्यात घेतले. या कारवाईत १९ किलो ६६० ग्रॅम गांजा, मारुती सुझुकी इर्टिगा कार आणि मोबाईल फोन असा एकूण १९ लाख १ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वेंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इर्टिगा कारमधून गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने मेहकर, जानेफळ आणि डोणगाव परिसरात अमली पदार्थ नेण्यात येणार आहेत. गौंडाळा शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली गांजाचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिसांनी विशेष पथक तयार केले. मेहकर-जानेफळ मार्गावरील गौंडाळा गावाजवळील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली पोलिसांनी सापळा रचला. यावेळी एमएच २८ सीसी ९८३४ क्रमांकाची इर्टिगा कार संशयावरून थांबवून शासकीय पंचांसमक्ष तिची झडती घेण्यात आली.
वाहनाच्या मागील डिक्कीमध्ये ठेवलेल्या दोन सुटकेसमध्ये १९ किलो ६६० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, कार आणि मोबाईल फोन असा एकूण १९ लाख १ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची नावे किरण विष्णू चांदणे (मुंदेफळ), योगेश वसंता पानभरे (पेडगाव), विकी रमेश दाभाडे, अभिषेक नारायण शेवाळे, संदीप आत्माराम दातार, सचिन भगवान फुके (जानेफळ) आणि रिया अमोल साठे (शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) अशी आहेत.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ७६३/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम २(ब), ८(क), २०(ब) आणि २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गांजा यापूर्वी जानेफळ, मेहकर आणि डोणगाव परिसरात आणखी कोणाला विकण्यात आला आहे का, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करणार आहेत. या तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक वेंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी, अशोक अवचार, कांचन जारवाल, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्यासह मेहकर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच सायबर बुलढाणा पथकानेही या कारवाईत मदत केली.
मेहकर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध अमली पदार्थ विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या गांजा तस्करी प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी काही माहिती समोर येते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
वाचकांसाठी महत्त्वाचे : मेहकर, बुलढाणा आणि परिसरातील स्थानिक बातम्या, पोलीस कारवाया, शेती, बाजारभाव आणि शासकीय योजनांच्या ताज्या अपडेटसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.










