manoj jarange : या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीला तोंडावर पाडणार, असे ‘मराठा’ आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले. अंतरवाली सराटी येथे इच्छुक उमेदवारांची बैठक जरांगे यांनी गुरुवारी बोलावली होती. यावेळी ते म्हणाले, मी राज्यात कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मतदारसंघात आमचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे मी कुणालाही शब्द दिलेला नाही. रात्री ८ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर, पुणे, धाराशिव, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची बैठक त्यांनी घेतली.
जरांगे यांना अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी
मनोज जरांगे पाटील यांना अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे गुरुवारी समोर आले. यामुळे खळबळ उडाली आहे. एका यूट्यूब चॅनेलच्या कमेंटमधून ही धमकी देण्यात आली आहे. कमेंटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार, अशा आशयाची ही धमकी कमेंटमध्ये लिहिण्यात आली आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाउंटवरून ही धमकी दिली आहे. त्यामुळे जरांगे बैठक घेत असलेल्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.