
crime : अमली पदार्थ विक्रीसह मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ८ लाखाचे हेरॉइन व १२ लाखांचे मोबाइल जप्त केले आहेत. या आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान दोघे जण पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. अंमली पदार्थ विक्रीमध्ये सक्रिय असलेल्या टोळीबद्दल ‘अमली पदार्थ’ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या सूचनेवरून वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांनी सहायक निरीक्षक श्रीकांत नायडू, नीलेश धुमाळ, ज्ञानेश्वर बनकर आदींचे पथक केले होते.
या पथकाने कोपरी परिसरात बुधवारी रात्री सापळा रचला होता. त्याठिकाणी संशयित महिला इतर काही महिला व पुरुषांशी चर्चा करत असतानाच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोन पुरुष पळून गेले, तर तीन महिला व एक पुरुष पोलिसांच्या हाती लागले. मोहम्मद जिशान पपू, रजिमा शमसुद्दीन शेख, अकलीना शेख व रजिमा शेख अशी या आरोपींची नावे आहेत. रजिमा शेख ही मानखुर्दची राहणारी असून मुंबईतून ड्रग्ज घेऊन कोपरी येथे देण्यासाठी आली होती.
पोलिसांनी कोपरी येथील त्यांच्या घराची झडती घेतली असता, तेथे सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या हेरॉइनच्या ५०५ पुड्या व १२ लाख रुपये किमतीचे ४० मोबाइल आढळले. हे मोबाइल त्यांनी शहरातील विविध रेल्वेस्थानके, गर्दीची ठिकाणे, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार सहा जणांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पळून गेलेल्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
पश्चिम बंगालचे मूळ रहिवासी
सर्व जण मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून कोपरीत एकत्र राहायला होते.
त्यांच्यातील पुरुष हे परिसरात मोबाइल चोरी करायचे, तर महिला कोपरी परिसरात ड्रग्ज विक्री करायच्या, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.