Latest news : कारचे हप्ते थकविल्याच्या कारणावरून मुलगा- वडीलाचे ए.एस. क्लब चौफुलीवरून अपहरण केले. त्यांना सातारा परिसरात मारहाण केली. यानंतर कारचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपहरण व मारहाणप्रकरणी फायनान्स कंपनीच्या चारजणांविरुद्ध एमआयडीसी Midc वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसन जनार्धन गटला, रा. नारळीबाग व त्यांचे मित्र नितीन लाजरस उमाप यांचा भागीदारीत कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी किसन गटला व त्यांचा मुलगा कार्तिक हे दोघे नितीन उमाप यांच्या पत्नी श्वेता उमाप यांच्या नावावर असलेली कार (क्र. एम.एच.२०, जी.ई. १९१६) मध्ये बसून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.
काम आटोपल्यानंतर दोघे पिता-पुत्र सोलापुर-धुळे महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरला घरी जाण्यासाठी निघाले होते. सांयकाळी पाचच्या सुमारास ए.एस. क्लब चौफुलीवर शहराच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी तरुणांनी कारसमोर त्यांची दुचाकी आडवी लावली.यावेळी गटला यांनी आम्हाला का आडविले? अशी विचारणा केली असता त्या दोघांनी आपली नावे श्याम शिंदे व सुलेमान असल्याचे सांगत या कारचे रेनॉल्ट फायनान्सचे ६ हप्ते थकलेले असून, हप्त्याचे पूर्ण पैसे भरा, नाहीतर गाडी सोडून जा, अशी धमकी देत कारची चावी काढून घेतली.
कारची चावी काढल्यानंतर त्या दोघांनी किसन गटला व कार्तिक या पिता-पुत्रास बळजबरीने कारच्या पाठीमागील सीटवर बसवले? एक जण त्यांच्या शेजारी बसला होता. दरम्यान, किसन गटला यांनी कारचे हैंड ब्रेक ओढून गाडी थांबविली. कार थांबताच अपहरणकर्त्याचे आणखी दोन अनोळखी साथीदार दुचाकीवरून आले. या चौघांनी दोघा पिता-पुत्रास कारच्या हप्त्याची मागणी केली. हप्ते भरायला पैसे नसतील कार सोडण्यासाठी ८ हजारांची मागणी केली.