जम्मू-काश्मीर मधील (Jammu kasmir attack) दोडा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसहित चार जवान शहीद तर एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने दोडातील देसा येथील वन क्षेत्रात हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. त्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी भागाला घेराव घालण्यात आला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले.
यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी. राजेश, जवान बिजेंद्र सिंह, अजयकुमार सिंह हे चार जण शहीद झाले, तर जम्मू-काश्मीर पोलिस दलाचा जवान गंभीर जखमी झाला आहे. पण त्याचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. शहीद जवानांपैकी कॅप्टन बृजेश थापा हे दार्जिलिंगच्या लेबोंग येथील रहिवासी आहेत.