Bandhkam kamgar yojna |महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटीत कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा कार्यालयामार्फत ऑनलाइन पद्धतीने केले जाते. त्यामुळे बांधकाम कामगारांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.
कार्यालयातील कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी, अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक केवळ एक रुपया शुल्क आकारण्यात येत असून, त्यांची रितसर पावती देण्यात येते.या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
बांधकाम कामगारांनी मंडळामार्फत वाटप सुरु असलेल्या गृहउपयोगी संच, सुरक्षा संच, अत्यावश्यक संच तसेच इतर लाभासंबधीच्या कामकाजाकरीता कोणत्याही अमिषाला बळी न पडता नोंदणी व नूतनीकरण करुन घ्यावे. या बाबतीत फसवणूक झाल्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.