वाशिम/विजय जुंजारे
: लोणी यात्रा उत्सव सुरू होण्याअगोदरच वादंग निर्माण झाला आहे. या वर्षीच्या लोणी यात्रा उत्सवात शिक्षकांकडून करवसुली करण्याचे आदेश देण्यात आल्याने संभाजी ब्रिगेडने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संभाजी ब्रिगेड वाशिमने स्पष्ट केले आहे की अशा निर्णयांमुळे शिक्षण व्यवस्था कोलमडत असून
करवसुली आदेश रद्द करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि पारंपरिक लोणी यात्रा उत्सव 20 तारखेपासून सुरू होत आहे. तब्बल 15 ते 20 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी पंचायत समितीकडून तब्बल वीस एकर परिसरात कर वसुलीची व्यवस्था करण्यात येते. मात्र, सरकारी यंत्रणांकडे आवश्यक कर्मचारी उपलब्ध असतानाही जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची ड्युटी करवसुली आणि देखरेखीच्या कामांसाठी लावण्यात आल्याचे समोर आले आहे.
याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या असल्याने शेकडो शिक्षकांवर आधीच निवडणूक ड्युटीचा भार आहे. त्यात पुन्हा यात्रा ड्युटीची जबाबदारी द्यायची म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर आणखी ताण येत असल्याचा शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचा आरोप आहे.
“आधीच शाळांवर बाह्य कामांचा डोंगर आहे, त्यात यात्रा कामगिरीची सक्ती—घरचं झालं थोडं आणि व्यायाच आलं घोडं अशी गत शिक्षण व्यवस्थेची झाली आहे,” अशी कठोर टीका संभाजी ब्रिगेड वाशिमचे जिल्हा प्रवक्ता व शाळा बचाव कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन खंदारे यांनी केली. त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती रिसोड आणि गटशिक्षणाधिकारी रिसोड यांनी यात्रा ठिकाणी लावलेल्या शिक्षकांच्या नेमणुका तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
“शिक्षकांना गैरशैक्षणिक कामात गुंतवणे हे शासनाच्या धोरणांना विरोध करणारे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सहन केले जाणार नाही,” असेही खंदारे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणी स्थानिक प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता नागरिकांचे लक्ष आहे.
KattaNews.in ला भेट द्या
🔗 Related News










