आरोग्य सहायक म्हणून बुलढाणा जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एकाचे वेतन प्रशासनाने थांबविल्यामुळे त्रस्त झालेल्या त्याच्या पत्नीने जिल्हा परिषद गाठून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसमोरच हातावर ब्लेड मारल्याने १० जुलै रोजी खळबळ उडाली होती.वेतन थकल्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड ही महिला करत होती. वनिता ज्ञानेश्वर खंडारे असे या महिलेचे नाव आहे.
दरम्यान तिचे पती ज्ञानेश्वर खंडारे हे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. मात्र, मागील सहा महिन्यांचे त्यांचे वेतन रखडलेले आहे. दरम्यान ज्ञानेश्वर खंडारे यांच्या सध्या विविध चौकशा सुरू आहेत. कर्तव्यावरही ते गैरहजर असतात. या कारणामुळे त्यांचे वेतन थांबविण्यात आले होते. अन्य काही प्रकरणातही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यातन हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान पतीचे वेनतच मिळत नसल्याने त्रस्त महिलेने १० जुलै रोजी जिल्हा परिषद गाठून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपुढे समस्या मांडत असतानाच हे कृत्य केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात खळबळ उडाली होती.