विशाल गवई /चिखली प्रतिनिधी
चिखली शहर पोलिसांनी डिझेल चोरी करणाऱ्या अटल टोळीचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चिखली पोलिसांनी तब्बल ₹२.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांना बुलडाणा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईने चिखली परिसरातील डिझेल चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसला आहे.
रात्री उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी
ही घटना चिखली तालुक्यातील बेराळा फाटा येथे २७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. फिर्यादी यांच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक MH-48-AY-4066) मधून सुमारे ७० लिटर डिझेल, अंदाजे ₹६,३७० किंमतीचे, चोरी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रक चालकाला डिझेल चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर तात्काळ चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.फिर्यादींच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास डी.बी. पथकाला सोपविला. पथकाने गुन्ह्याची गंभीर दखल घेत सखोल तपास सुरू केला.
हे पण वाचा.
गुप्त माहितीवरून टोळीचा शोध
तपासादरम्यान पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मेहकर फाटा परिसरात पांढऱ्या रंगाची Xcent कार उभी आहे आणि त्या वाहनात काही इसम संशयास्पदरीत्या बसले आहेत. ही माहिती मिळताच डी.बी. पथकाचे पोउपनि समाधान वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.
तेथे दोन इसम पोलिसांना पाहून घाबरले आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मात्र पुढील चौकशीत त्यांनीच डिझेल चोरी केल्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांच्या साथीदारांचा शोध घेऊन पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली. सर्व आरोपींनी मिळून ट्रक मधील डिझेल चोरी केल्याचे कबूल केले.
आरोपींची नावे आणि जप्त मुद्देमाल
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत —
हर्षद पाडुरंग साबळे (२५, डोलखेडा बु., ता. जाफ्राबाद)अनिकेत श्रीमंत (१९, गजानन नगर, चिखली)स्वप्नील जाधव (२८, कोनड, ता. चिखली)विनोद उर्फ बबलू मंजुळकर (३३, आनंद नगर, चिखली)संजय शिवनकर (४३, शिनगाव जहागिर, ता. दे.राजा)या आरोपींनी चोरी केलेले डिझेल शिनगाव जहागिर येथे विकल्याचीही कबुली दिली आहे.
पोलिसांनी या ठिकाणाहून ३० लिटर डिझेल, दोन कॅन आणि पांढरी Xcent कार असा मुद्देमाल जप्त केला. एकूण ₹२,५५,७६० किंमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोउपनि समाधान वडणे, पोना अमोल गवई, पोना प्रशांत धंदर, अजय इटावा, रुपाली उगले, राजेंद्र काळे, तसेच सायबर पोलीस विभाग बुलडाणा यांचा सक्रिय सहभाग होता.
फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीपासून अवघ्या काही तासांत पोलिसांनी टोळीला गजाआड करत चोरीचे डिझेल हस्तगत केले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने दाखवलेली कार्यक्षमता ही बुलडाणा जिल्ह्यातील पोलिसांसाठी आदर्श ठरली आहे.
अशाच आणखी स्थानिक गुन्हे आणि पोलिस कारवाईच्या बातम्यांसाठी 👉 KattaNews.in ला दररोज भेट द्या!











