नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
वाशिम येथे मुख्यराज्यमार्ग ५१ लगत असलेल्या लाखाळा परिसरात वाशिम- रिसोड रस्त्यावर संत निरंकारी भवनात दिनांक १५ सप्टेंबर रोज रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदात्यांनी संत निरंकारी भवनात शिबिरामध्ये येऊन रक्तदान करावे, असे आवाहन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वाशिमच्या जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपनिवासी अधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे,मा.आ. निलय नाईक, तहसीलदार निलेश पळसकर, वाशिम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनीष मंत्री, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी अनिल अडागळे, प्रा. दिलीप जोशी, श्रीराम महाराज, जगदीप महाराज यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने देशभरात असेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात रक्तदान शिबिरात निरंकारी भक्तगणासह नवयुवक रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतात. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्यावतीने नेहमीप्रमाणे सतत वर्षभर आपल्या मिशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, रक्तदान, आरोग्य शिबिरे तसेच नदी नाल्याची स्वच्छता, शैक्षणिक उपक्रम,सामाजिक उपक्रम सातत्याने राबवल्या जातात.
संत निरंकारी मिशनचा प्रमुख उद्देश हा ब्रह्मज्ञानाद्वारे मानवता प्रस्थापित करणे असल्याचे अनेक जाती धर्माचे लोक निरंकारी विचार अमलात आणत आहेत. असे मिशनच्या प्रचारा दरम्यान दिसून आले. रक्तदान हे महादान आहे. यासाठी सर्व युवकांनी व रक्तदात्यांनी पुढे यावे असे आवाहन संत निरंकारी मिशनचे वाशिम प्रमुख संतोष खोडे, रक्तदान शिबिराचे संयोजक अक्षय अंभोरे, सेवा दलाचे प्रमुख दत्तात्रय बंडेवार, सचिन सोनुने, डॉ.के.टी. चांदवानी यांनी केले आहे.