सिंदखेडराजा | समाधान सरकटे
पावसाने पाठ फिरवल्याने यंदा सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पेरणीच्या क्षेत्रात सुमारे ८० टक्क्यांनी घट झाली असून, तालुक्यात केवळ ७,७९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पाण्याअभावी शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
सिंदखेडराजा तालुक्याचे एकूण शेती क्षेत्र सुमारे ६५ हजार हेक्टर आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, संकरित ज्वारी, मूग, उडीद, तूर, मका आणि हळद या पिकांची लागवड केली होती. सुरुवातीला पिकांची वाढही चांगली झाली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात १५ तारखेपर्यंत झालेल्या रिमझिम पावसानंतर पावसाने दडी मारली. त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे नदी-नाले कोरडे पडले. कट्टा, पाझर तलाव, सिंचन तलाव आणि विहिरींमधील पाणीसाठाही कमी होऊ लागला. उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली, तर कपाशीच्या पिकालाही मोठा फटका बसला. कपाशीला अपेक्षित बोंडधारणा होण्यापूर्वीच फुलांची गळती झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था होती, त्यांना काही प्रमाणात पिके वाचविणे शक्य झाले; मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली.
गतवर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. एकूण ६५ हजार हेक्टर शेती क्षेत्रापैकी तब्बल ३८ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. म्हणजेच सुमारे ५५ टक्के क्षेत्र रब्बी पिकांखाली आले होते. त्यामध्ये १८ हजार ५३१ हेक्टरवर हरभरा, ११ हजार ८९६ हेक्टरवर गहू, ४ हजार ५१६ हेक्टरवर ज्वारी, ८५० हेक्टरवर मका आणि ६९ हेक्टरवर करडीची पेरणी करण्यात आली होती.
यंदा मात्र पाण्याअभावी रब्बी हंगामाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, यंदा हरभरा ४ हजार ५० हेक्टर, गहू ८०० हेक्टर, ज्वारी २ हजार ८८७ हेक्टर आणि करडी १०८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आली आहे. मक्याला यंदा एक हेक्टर क्षेत्रातही स्थान मिळालेले नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत रब्बी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. एकूण पेरणीचे क्षेत्र सुमारे ७,७९० हेक्टर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पेरणी झाली असली तरी पुढील काळात पिकांना पुरेसे पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. ज्वारी पिकावर पक्षी, हुरडा खाणारे आणि मजुरांचा वाटा गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात किती उत्पादन उरणार, हा प्रश्न आहे. हरभरा पिकालाही वन्यप्राण्यांचा आणि चोरीचा धोका असतो. अशा परिस्थितीत मेहनत, बियाणे, खते आणि मजुरीवर खर्च करूनही शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित उत्पन्न पडेलच याची खात्री राहिलेली नाही.
गेल्या वर्षी पिकांचे उत्पादन चांगले झाले, मात्र शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. यंदा परिस्थिती उलटी झाली आहे. पिकांचे उत्पादन घटले असताना बाजारात भाव मिळण्याची शक्यता असली तरी विक्रीसाठी पुरेसा मालच हातात राहील का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप आणि रब्बी हंगाम आर्थिकदृष्ट्या कसोटीचा ठरत आहे.
शेतकरी स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि समाजाची अन्नाची गरज भागविण्यासाठी सतत मेहनत घेत असतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याच्या कष्टाचे गणित वारंवार बिघडत आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील रब्बी पेरणीतील मोठी घट ही केवळ आकडेवारी नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेल्या संकटाचे चित्र आहे. आगामी काळात पावसाची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा यावर उर्वरित पिकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील रब्बी पेरणीतील घट आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींकडे आता संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा!
Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!










