बुलढाणा|भागवत गायकवाड
बुलढाणा तालुक्यातील धामणगाव धाड येथे एका ३० वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. समाधान तुकाराम गुजर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.
धाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान गुजर हा शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे आणि पत्नीचे वारंवार वाद होत होते. या कौटुंबिक वादातून त्याची पत्नी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन बऱ्याच दिवसांपासून माहेरी राहत होती. समाधान हा आई शांताबाई यांच्यासोबत धामणगाव धाड येथील राहत्या घरी राहत होता.
दरम्यान, गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ५.४५ वाजताच्या सुमारास समाधान याचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती नातेवाईकांनी त्याचा चुलतभाऊ नारायण सुरेश गुजर (रा. शेलूद, ता. भोकरदन) यांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच नारायण गुजर यांनी धामणगाव धाड येथे धाव घेतली आणि धाड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चौहान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी धाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे गुजर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम वाचण्यासाठी KattaNews.in शी जोडलेले राहा.
WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा ✅
संबंधित बातम्या
- देऊळगाव राजा परिसरात जंगलात 2 कोटींचा मसाला फेकल्याची चर्चा; मसाला नेमका कोणता आणि फेकण्यामागचं कारण काय?
- दीड एकरांत फक्त दोन पोती सोयाबीन; कर्जफेडीच्या चिंतेत ६५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या, लोणार तालुक्यातील घटना
- देऊळगाव राजा बाजार समितीच्या जमिनींची चौकशी सुरू! चंद्रकांत खरात यांच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल










