देऊळगाव राजा | प्रतिनिधी : मनोहर खंदारे
ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेची ओळख असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांच्या वार्षिक यात्रा उत्सवाची भाविकांना आता प्रतीक्षा लागली आहे. महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक श्री बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी देऊळगाव राजा येथे येतात. यंदाच्या यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने सुरुवात होणार असून, त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
यात्रेतील घटस्थापना आश्विन शु. १, रविवार, ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेली दसरा पालखी मिरवणूक मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून सुरू होऊन बुधवार, २१ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.
तसेच लळीत उत्सव गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.४५ वाजता होणार आहे. त्यामुळे या काळात देऊळगाव राजा येथे धार्मिक वातावरण निर्माण होणार असून, भाविकांचीही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
यंदाचा आश्विन यात्रा उत्सव ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर कार्तिक यात्रा उत्सव १० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांनी श्री बालाजी महाराजांचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयंसिंह जाधव आणि व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.
यात्रा उत्सव जवळ येत असल्याने संस्थानच्या वतीने तयारीलाही वेग आला आहे. श्री बालाजी महाराजांच्या उत्सवाची माहिती जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचावी, यासाठी पत्रकार बांधव व भगिनींच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही वृत्तपत्रे आणि विविध माध्यमांच्या माध्यमातून यात्रा उत्सवाचा प्रचार-प्रसार करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
याशिवाय सर्वे नंबर ९८ वरील यात्रा नियोजनासाठी जागावाटप समितीच्या सदस्यांची अंतर्गत सहविचार सभा घेण्यात आली. यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांची संख्या आणि उपलब्ध जागा लक्षात घेऊन नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, यात्रेचे नियोजन अधिक व्यवस्थित व्हावे आणि विविध विभागांची जबाबदारी स्पष्टपणे निश्चित करता यावी, यासाठी संस्थानने प्रशासनाकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार यात्रेचा व्यवस्थापन आराखडा आणि प्रमाणित कार्यपद्धती (SOP) जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित करावी, तसेच संबंधित विभागांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करून यात्रा आणि उत्सवासाठी आवश्यक परवानग्या द्याव्यात, अशी मागणी श्री बालाजी संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला भाविकांची मोठी उपस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने देऊळगाव राजा शहरात धार्मिक वातावरण पाहायला मिळणार असून, भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews WhatsApp ग्रुप जॉइन करा
📰 Related News
“साहेब, काडही १० किलो भरत नाही; सोयाबीनचे दाणे कोठे शोधणार?” साखरखेर्डा परिसराततील शेतकऱ्यांची व्यथा










