पेरणीपासून मशागत, बियाणे आणि खतावर खर्च करून उभे केलेले सोयाबीन पीक अपेक्षेप्रमाणे वाढले नाही. तुरळक उगवलेल्या झाडांनाही फुले आणि शेंगा न लागल्याने साखरखेर्डा येथील शेतकरी शालिग्राम नामदेव गवई यांच्यावर अखेर उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली. उत्पादनाची आशा मावळल्याने त्यांनी पीक नष्ट केले. या घटनेमुळे बियाण्याची गुणवत्ता, पिकाची उगवण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गवई यांची गट क्रमांक ४७ मध्ये ६७ आर शेती आहे. या क्षेत्रात त्यांनी अंकुर कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित उगवण झाली नाही. तुरळक उगवलेल्या सोयाबीनच्या झाडांनाही फुले आणि शेंगा लागल्या नसल्याचे गवई यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादनाची शक्यता मावळल्याने त्यांनी अखेर उभ्या पिकावर नांगर फिरविला.
पेरणीपूर्व मशागत, बियाणे आणि खतासाठी केलेला खर्च यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे गवई यांनी सांगितले. संबंधित बियाण्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी आक्षेप नोंदविला असून, पिकाचा पंचनामा करून बियाण्याची अधिकृत तपासणी करावी व संबंधित कंपनीविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
परिसरातील अन्य काही शेतकऱ्यांनाही अशाच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तुमच्या गावातील बातमी आम्हाला पाठवा!
शेतकरी समस्या, स्थानिक घटना किंवा महत्त्वाची माहिती असल्यास KattaNews शी संपर्क साधा. तुमची बातमी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
संबंधित बातम्या
टीप : बियाण्याच्या गुणवत्तेबाबतचा आरोप हा शेतकऱ्याचा दावा आहे. अधिकृत तपासणीचा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.










