अर्जुन बबन राठोड (वय २०, रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे लोणार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी काही दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पुढे जाण्याची शक्यता आहे.
देऊळगाव कुंडपाळ येथील प्रकाश किसन सरकटे यांनी आपली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी शेतात उभी केली होती. ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ही दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरी झालेल्या दुचाकीचा क्रमांक एमएच-२८-बीएस-५६७१ असा आहे. याप्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५६/२०२६ दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी लोणार-मंठा मार्गावरील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोणार-तळणी रस्त्यावरील एका पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरीची दुचाकी घेऊन जाणारा संशयित व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान संशयित मंठा-उसवद मार्गावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा पाठलाग सुरू होताच संशयिताने रस्ता सोडून शेताच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला.
अखेर मंठा तालुक्यातील मुरुमखेडा शिवारात स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने पोलिसांना संशयिताला पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान लोणार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी तीन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये तीन हिरो स्प्लेंडर प्लस, एक एचएफ डिलक्स आणि एक बजाज सीटी हंड्रेड या दुचाकींचा समावेश आहे. यापैकी तीन दुचाकींवर नोंदणी क्रमांक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ५३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे लोणार परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा आणि त्यांच्याशी संबंधित चोरीच्या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रकाश सदगिर आणि सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत संजय जाधव, नितीन खराडे, अनिल शिंदे, गणेश तामसकर, तेजराव भोकरे, गणेश लोढे, सुनील गाडे आणि नीता शिंदे यांनी सहभाग घेतला.
📲 लोणार आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
महत्त्वाच्या स्थानिक बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
संबंधित बातम्या
- जालना SRPF कॅम्पमध्ये मध्यरात्री खळबळ; बुलढाणा जिल्ह्यातील गुंजच्या 25 वर्षीय जवानाने स्वतःवर झाडली गोळी
- चारित्र्याच्या संशयाने संसार उद्ध्वस्त; ‘तुझे कोणासोबत लफडे आहे’ म्हणत पत्नीला बेदम मारहाण, अखेर मृत्यू
- मलकापूर पांग्र्यात मध्यरात्री सराफा दुकान फोडले; चोरट्यांचा डाव फसला, एक संशयित पोलिसांच्या ताब्यात
अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी KattaNews.in ला भेट देत रहा.










