बुलढाणा |प्रा.दिलीप नाईकवाड
जिल्ह्यातील मेहकर–डोणगाव मार्गावरील हिवरा साबळे फाट्याजवळ घडलेल्या भीषण अपघातात 75 वर्षीय ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुरेशराव काशीनाथ वानखेडे हे जखमी झाले. भरधाव वेगाने समोरून आलेल्या आयशर वाहनाने त्यांच्या होंडा बीआर-व्ही कारला जोरदार धडक दिल्याने कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, वाहनातील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली आणि त्यांचा जीव थोडक्यात बचावला.
ही घटना 18 जुलै रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी हलविण्यात मदत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. सुरेशराव वानखेडे (रा. शिवाजीनगर, ता. मेहकर, जि. बुलढाणा) हे त्यांच्या होंडा बीआर-व्ही कारने मेहकरहून डोणगावकडे जात होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.
अपघातात अॅड. वानखेडे यांच्या छातीला गंभीर मार लागला असून मानेलाही दुखापत झाली आहे. कारचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धडक अत्यंत भीषण होती. मात्र कारमधील एअरबॅग योग्य वेळी उघडल्याने चालकाचे डोके आणि छाती स्टीयरिंगवर आदळण्यापासून वाचली. त्यामुळे गंभीर दुखापत आणि संभाव्य जीवितहानी टळली.
या प्रकरणी अॅड. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलिस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125(अ), 324(4) व 324(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वाहनांमधील एअरबॅग ही केवळ अतिरिक्त सुविधा नसून ती गंभीर अपघाताच्या वेळी जीव वाचवणारी महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा असल्याचे या अपघातातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धडकेच्या क्षणी एअरबॅग सक्रिय झाल्यामुळे अॅड. वानखेडे यांचा जीव वाचल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
Related News
- जास्तीच्या मजुरीच्या आमिषाने गेला जीव! खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट काढताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात
- धाड पेट्रोल पंप चोरीचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; आरोपी जेरबंद, ₹1.05 लाखांची संपूर्ण रक्कम जप्त
- चिखली पोलिसांची मोठी कारवाई! MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, दोघांना 3 महिन्यांसाठी तडीपार










