साखरखेर्डा | प्रतिनिधी : समाधान सरकटे
विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी दामिनी पथकाने साखरखेर्ड्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेट देत जनजागृती केली. विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थिनींना टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी समोर आले. काही दिवसांपूर्वी साखरखेर्डा येथे काही युवकांनी मुलींचा पाठलाग करत शाळेच्या परिसरात गोंधळ घातल्याची घटना घडली होती. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून दामिनी पथकाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
द्रोपदी साळवे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कोणत्याही प्रकारचा छेडछाड, पाठलाग, धमकी किंवा मानसिक त्रास सहन करू नका. त्वरित 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करा. तुमची तक्रार मिळताच काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचून आवश्यक कारवाई करतील.”
महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी दामिनी पथकाची स्थापना केली असून हे पथक जिल्हाभर प्रभावीपणे कार्यरत आहे. महिलांना आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या विशेष मोहिमेत साखरखेर्ड्यातील एसईएस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कै. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय येथे विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला.
या कार्यक्रमात महिला पोलीस कर्मचारी वैष्णवी काळे यांच्यासह पोलिसांचा सहभाग होता. प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
महिला किंवा विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास 112 या आपत्कालीन क्रमांकावर किंवा 07262-242400 या संपर्क क्रमांकावर त्वरित माहिती देण्याचे आवाहन दामिनी पथकाने केले आहे.
📢 KattaNews.in सोबत कायम अपडेट रहा
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.
📰 संबंधित बातम्या
- शेलगाव जहांगीर प्रकरणाला मोठे वळण; पीडित मायलेकीची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट
- चिखली नगर परिषदेचा अजब कारभार; मालमत्ता करात चक्क 10 पट वाढ?
- सायाळा येथे शेतकऱ्याच्या विहिरीतून सोलर मोटार पंप चोरी; परिसरात चोरांची दहशत
- बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा










