बुलढाणा/प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील ST बसमध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या एका महिला कंडक्टरनेच प्रवाशांशी उग्र भाषेत वाद घातल्याचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
“तू कोण कलेक्टर आहे का, की होम मिनिस्टर?” असे थेट प्रश्न विचारत कंडक्टरने प्रवाशांना झापल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते.मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव आगाराची बस वरवट बकाल येथून शेगावच्या दिशेने जात होती.
बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने वातावरण तापले आणि किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या गोंधळात झाले.महिला कंडक्टरने जादा प्रवाशांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी वापरलेल्या कठोर आणि उद्धट भाषेमुळे परिस्थिती आणखी बिघडली.
वाद वाढत असताना कंडक्टरचा संयम पूर्णपणे सुटल्याचे दिसून आले.
“तू कोण होम मिनिस्टर आहेस का? मोदी असला तरी मी काय करू?” अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.
हा प्रकार पाहून काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला आणि तोच आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या घटनेमुळे बसमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.उपस्थित नागरिकांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र कंडक्टर कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
दरम्यान, या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.या प्रकरणावर परिवहन विभाग आणि शेगाव आगार प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी Kattanews.in फॉलो करा.










