– शब्दांकन –
Thought :-
नमस्कार वाचक मान्यवर मित्रांनो,
माझं लिखाण सर्वदूर पोहोचत आहे नि त्याला प्रत्येक धर्मीय बांधव वाचतो आणि त्याबद्दल व्यक्त होतो आहे…
ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे आणि मी आपला आजन्म ऋणी राहील यासाठी….
मित्रांनो,
आपला भारत देश एक खंडप्राय देश आहे….
आणि त्यात अनेक जातीधर्माची लोकं गुण्यागोविंदाने राहताना दिसतात…
पण मुळात लोकांच्या मनात असलेला हा एकीचा भाव इतका तकलादू का होतांना दिसतो कधीकधी हा मुख्य प्रश्न आहे….
आपला भारत देश अनेक बाबतीत विसंगत असल्याचं आपल्याला दिसतं…
लोकांच्या आर्थिक स्थितीतील फरक त्याचबरोबर जीवनमान, राहण्याची शैली, वस्ती व कॉलोन्या यातील तफावत, गरीब व श्रीमंत यांतील दरी,
ग्रामीण व शहरी भाग व शिक्षित व अल्पशिक्षित त्याचबरोबर अशिक्षित लोकांचं सहवासिक जगणं, राजकीय-अराजकीय लोकांचं प्रमाण, जातीभेद करणारी मानसिकता व सर्वधर्मसमभाव जपणारी मानसिकता असणारी लोकं हे सगळे आपल्या समाजात राहतात…
आपण बघतोच की वस्ती किंवा आपलं राहण्याचं ठिकाण दर्जा ठरवत असतं माणसाचा….
आणि त्यात उच्चभ्रू लोकांच्या वस्तीकडे सगळे आदर व भीतीने पाहतात तर सामान्य व गोरगरीब लोकं राहत असलेली वाड्या किंवा वस्त्या त्याचप्रमाणे झोपडपट्ट्या ही ठिकाणे प्रत्येक व्यक्ती व तथाकथित श्रीमंत तसेच त्यांची चाकरी करणाऱ्या यंत्रणा यांच्या टार्गेटवर असतात….
हजार रुपयांची लायकीप्रमाणे चोरी करून वर्षानूवर्ष खितपर पडणारा झोपडपट्टी वासीय एकीकडे आणि हजारो कोटी रुपये घेऊन देश सोडून पळून जाणारे भामटे एकीकडे…
हा आहे आपला देश….
या नुसत्या राहण्याच्या ठिकाणावरून आपण चांगलं अन वाईट म्हणजे गुड आणि बॅड ठरवून मोकळे होतो…
त्याच्या भरीस माध्यमे व चित्रपट देखील या गोष्टी बिंबवण्यात मागे राहत नाही…
आणि याच गुड व बॅड या बाबीत गुरफटून व्यक्ती किंबहुना समाज बरबाद होतांना दिसून येतो कधीकधी…
चित्रपटात रंगवला जाणारा जो झोपडपट्टी वासीय असतो त्यांची मानसिकता खालील प्रमाणे बनून जाते…
झोपडपट्टीत जन्माला येणारे स्वतःला कमी लेखतात….
त्यांचा स्वतःच्या कला-कौशल्ये तसेच क्षमता याचबरोबर स्वतःवर विश्वासच नसतो मुळात….
६ ×६ च्या खोलीतच सामावलेले त्यांचे विश्व…
आणि रोजच्यापुरती दारू व भाकरी याच्यापूरती तुटपुंजी कमाई इतकेच त्यांचे आयुष्य असते….
यापलीकडे कसलीच स्वप्नं त्यांच्या डोळ्यात नसतात….
मुळात स्वप्न पाहणे, हेच त्यांच्यासाठी एक अपराध असतो….
झोपडपट्टीतील लोकांची अशी मानसिकता कशामुळे तयार झाली…?
नेमके काय कारण आहे की ते असा विचार करतात..?
त्यांनी स्वतःला इतक्या खालच्या पातळीवर पाहण्यास सुरुवात केली असेल….
तर याचे उत्तर आहे आपले ‘पॉप्युलर कल्चर’….
अनेक दशके उलटली,
वर्षानुवर्षे आपल्या चित्रपट आणि टीव्हीवरच्या मालिकांमधून झोपडपट्टीचे चित्रीकरण केवळ गुन्हेगारांचे केंद्रस्थान आणि समाजावर जास्तीचा भार असणारा भाग म्हणून केलं जात आलंय….
चित्रपटात भ्रष्ट असो वा इमानदार असे अधिकारी व त्या पोलीस एन्काउंटरचे सीन जणूकाही झोपडपट्टीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही….
गुन्हेगारांच्या मागे पळणारे पोलीस झोपडपट्टीत चित्रित केले जात असतील तर वेगळ्या लेवलचा थरकाप निर्माण होतो हा त्यामागचा दृष्टिकोन….
व झोपडपट्टीत राहणारे लोक नेमके त्याच वेशभूषेत राहताना आपल्याला नजरी पडतात…
आणि याच गुन्हेगारी व त्याला उद्युक्त करणारी मानसिकता यांचा झोपडपट्टीतील युवकांवर तोच परिणाम झाला, जो ‘पॉप्युलर कल्चर’ ला अपेक्षित होता….
या भागातील लोक गुन्हेगारीत गुंतत गेले….
‘पॉप्युलर कल्चर’ चे ‘पॉप्युलर नरेशन’ तोडणे त्यांच्याने शक्य झाले नाही….
आता मात्र तिथे जन्माला येणारी पिढी या ‘पॉप्युलर नरेशन’ उध्वस्त करण्यास पेटून उठली आहे…..
ही आनंदाची बाब आहे…
अशा मानसिकतेतून बाहेर पडून तिथली मूले अभ्यास करून उच्चशिक्षित होत आहेत…
त्यापैकीच एक महत्त्वाचं म्हणजे तशा घटकांतून बाहेर पडून कोल्हाट्याचं पोर हे पुस्तक लेखक लिहू शकला…
पण जे झोपडपट्टी वासीयांना जमले तसे ते ‘पॉप्युलर नरेशन’ तोडून त्या चाकोरीबाहेर मुस्लिम समाजाला येता येऊ शकलं नाहीय हे आजही खेदाने नमूद करावे लागेल….
ज्याप्रमाणे झोपडपट्टीला बदनाम करण्यासाठी ‘पॉप्युलर नरेशन’ बनवला गेला होता अगदी असाच एक ‘पॉप्युलर नरेशन’ मुस्लिम समाजाबद्दल सेट करण्यात आला आहे….
देशाच्या फाळणीपासून आजपर्यंत गेली ७६ वर्षे हा नरेशन ‘पॉप्युलर कल्चर’च्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरला गेला आहे….
चित्रपट, टीव्ही मालिका, कथा, कादंबरी, साहित्य, कवितांमधून (आता वृत्तसंस्थांतर्फेदेखील) मुस्लिम म्हणजे देशविरोधी आणि धर्मांध…
त्याची अशी प्रतिमा यशस्वीपणे ठसविण्यात आली….
ज्याचा परिणाम असा झाला की, गेली ७६ वर्षे मुस्लिमांच्या तीन पिढ्या या ‘पॉप्युलर नरेशन’ च्या दबावापुढे झुकत गेल्या…..
९० च्या दशकात व त्यानंतर जन्माला आलेली पुढील पिढी जणू ‘मुस्लिम’ असण्याचा न्यूनगंड घेऊनच जन्माला आली….
मुस्लिम म्हणून या देशात जन्माला येणे म्हणजे गुन्हा आहे की काय असे त्यांना वाटायला लागले….
आणि हा न्यूनगंड झटकण्यासाठी त्यांनी स्वतःला मुस्लिम समाजापासून वेगळे दाखविण्याची स्पर्धाच सुरु केली….
यातून ‘गुड मुस्लिम-बॅड मुस्लिम’ म्हणजे चांगला ‘मुस्लिम व वाईट मुस्लिम’ ची प्रतिमा उभे राहिली….
‘पॉप्युलर नरेशन’समोर गुडघे टेकणारा मुस्लिम ‘गुड’ झाला….
तर ‘पॉप्युलर नरेशन’च्या विरोधात छाती ठोकून उभे राहणारा मुस्लिम ‘बॅड’ झाला किंवा ठरवला गेला….
याच ‘पॉप्युलर कल्चर’च्या ‘पॉप्युलर नरेशन’ने लादलेले नियम वाहणारा मुस्लिम ‘आदर्श’ म्हणून रंगविला जाऊ लागला…
तर त्याचे खंडन करणारा मुस्लिम ‘राष्ट्रद्रोही आणि धर्मांध’ म्हणून सादर केला जाऊ लागला….
आणि त्याच्या नावाने अनेकांनी भीती दाखवून सत्ता हस्तगत केल्या ते ही नमूद करावे लागेलच…!
‘पॉप्युलर नरेशन’ला बळी पडलेल्या ‘गुड मुस्लिम’ने परिस्थितीचे खापर बॅड म्हणवल्या जाणाऱ्या मुस्लिमांच्या डोक्यावर फोडणे सुरु केले….
मुस्लिमांच्या व्यथा, मुस्लिमांचे दुःख आणि मुस्लिमांच्या वाट्याला येणारे अपमानास्पद अनुभव मांडून त्याचे खंडन करण्याएवजी ‘पॉप्युलर नरेशन’ला साजेशी भूमिका घेतली…..
यातून ‘पॉप्युलर नरेशन’ आणखी जास्त गडद होत गेले…..
मुस्लिमांची गुन्हेगार, देशद्रोही, धर्मांध आणि रानटी प्रतिमा उभी करण्यात जितके योगदान ‘पॉप्युलर नरेशन’चे आहे, तितकेच किंबहुना त्याहून जास्त योगदान ‘गुड मुस्लिम’ मानसिकतेचे आहे…..
व ही मानसिकता आता या नरेशन नुसार स्वतःच्या घराला आग लावत आहे….
मुळात देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बहुसंख्य व अल्पसंख्य समाजात विषमता असायला नको…
पण खुर्चीचे भुकेले दिवसरात्र वाद लावून वातावरण दूषित करण्याचं काम करत आहेत….
गुड मुस्लिम आणि बॅड मुस्लिम असं काही नसतं….
सच्चा मुस्लिम हा देशभक्तच असतो आणि तो इतर धर्मांचा तितकाच आदर करतो जितका स्वतःच्या धर्माचा….
पण हे असे नरेशन त्याला टाईपकास्ट करत असतात….
जे सर्वथा चुकीचे आहे….
मुळात आज आपल्या देशाला विकसित करण्यासाठी हिंदू-मुस्लिम ही दोन चाके आवश्यक आहेत आणि त्यांच्या एकीतच देश मजबूत राहील….
म्हणून हिंदूं बांधवांनी मुस्लिमांचा मोकळ्या मनाने स्वीकार करावा व मुस्लिमांनी देखील हिंदू बांधवांचा स्वीकार करावा….
एकमेकांच्या संस्कृती समजून घेऊन त्यांच्या सन्मान करण्यातच देशाचे व पर्यायाने समाजाचे भले आहे….
आपलाच :-
✍🏻प्रा. हबिबखान पठाण (शब्दकुंदन)….