ग्रामीण युवकांच्या उद्योजकतेला नवी दिशा : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा संविधान दिनी भव्य शुभारंभ

On: November 26, 2026 11:30 AM

राज्यातील ग्रामीण भागातील युवक, युवती आणि शेतकऱ्यांना पशुधनाधारित व्यवसायातून उद्योजक व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासनाने महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ आणली आहे. या योजनेचा शुभारंभ गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.या शुभारंभानंतर त्याच दिवशी सायंकाळी ४.०० वाजेपासून महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) या पोर्टलवर ऑनलाइन अर्जस्वीकृतीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.योजनेचा लाभ काय?या योजनेअंतर्गत अर्जदाराला आपल्या गरजेनुसार गाय, म्हैस यांसारख्या मोठ्या दुभत्या पशुधनासह शेळीपालन व कुक्कुटपालन यांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेले शेड व चारा योजना यांचाही अर्जामध्ये समावेश करण्यात आला आहे.महाआयटी व पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयातून ही अत्याधुनिक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्जदाराने निवडलेल्या घटकांनुसार प्रकल्पाचा एकूण खर्च, त्यावर मिळणारे शासकीय अनुदान व लाभार्थ्याने भरावयाची उर्वरित स्वगुंतवणूक याची स्पष्ट माहिती अर्ज भरतानाच प्रणालीवर तत्काळ दिसणार आहे.अर्ज कसा करावा?संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून अर्जांची छाननी व निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.अर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यांनी आपला फार्मर आयडी (Farmer ID) आणि महाआयडी (MahaID) तयार करून ठेवावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्कयोजनेची सविस्तर माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही शंका किंवा समस्या असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, पशुसंवर्धन विभागाच्या तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयात संपर्क साधावा. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर संपर्क साधावा.- संदिप धुरंधर, न्यूज कट्टा, मोताळा तालुका प्रतिनिधी








