नारायण आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
कोणी मला वाट देता का वाट ? माझी कहाणी कुणाला सांगू, कळेनाशे झाले ! मी आहे तरी कोणत्या भागात, सांगावं तरी कुणाला ऐकायला कुणीही तयार नाही. ऐकणारे गेले सहलीवर,त्यांनी सुद्धा आत्तापर्यंत दुर्लक्ष केले.गावातील सांगणारानेही कुणाला सांगावं, प्रश्नाची काही उकल होईना. मी आहे चौकात पण मला वाट द्यायची नाही कुणाची औकात, अशीच अवस्था माझी झाली.
चौका-चौकात माझीच चर्चा पण मला कोणी वाट द्यायला तयार नसल्याने मी एकाच जागेवर असल्याने, दुर्गंधी सुटत चालल्याने मी त्रस्त झाले.माझ्या जवळ उभे राहायला तयार नाही.माझ्या मधून कोणताही चारचाकी गाडीवाला येतो, त्याला माझ्या मधूनच जावं लागते पण याबाबत कोणीही दखल घ्यायला तयार नाही. मी जावे तरी कुणाकडे,या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं तरी कोणी ? ज्यांनी द्यायचं ते गेले सहलीवर ही गोष्ट आहे.
एका खड्ड्याची त्यामध्ये बारा महिने पाणी साचलेले असते असा रिठद गावातील माजी सैनिक देविदास बोरकर, मदन आरु गुरुजी यांच्या घरासमोरील खड्डा,नेहमी दुर्गंधी पाण्याने भरलेला खड्डा आहे याची दुरुस्ती कधी होणार ? कोण जाणे ! ग्रामविकास अधिकाऱ्याला फेरफटका मारतांना सुद्धा साचलेले डबके दिसत नाही.ते गावातच कधी येतात .त्यांनाच माहीत,ज्यांना माहीती असते ते सुद्धा सहलीवर गेले.हे गावचे दुर्दैव!