नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी
रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मुख्य रस्त्यावर पोस्ट ऑफिस समोर देशी दारू चे दुकान स्थानांतरित करण्यासाठी मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड यांनी ना हरकत परवानगी दिली होतो. परंतु वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सय्यद अकील व शहराध्यक्ष मोहम्मद आसिफ यांच्या नेतृत्वात वारंवार मुख्याधिकारी व तहसीलदार यांना सदर दुकानाची ना हरकत रद्द करण्यासाठी निवेदने दिली.
त्या निवेदनाला कराची टोपली दाखवीत प्रशासनाने कवडीमात्र ही प्रतिसाद दिला नाही म्हणून 28 ऑगस्ट पासून सय्यद अकील, मोहम्मद आसिफ, सय्यद नाजीम,शुभम सावंत,या चौघानी आमरण उपोषनाचे शस्त्र वापरले होते. पहिले दोन दिवस कोणतीच दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालली होती. नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी तिसऱ्या दिवशी दखल घेत उपोषणकरांशी संवाद साधून येत्या दहा दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन जागेची उपयुकत्तता बघता देशी दारूच्या दुकानाला दिलेली ना हरकत रद्द करन्याचे लेखी आश्वासन देऊन सदर उपोषणाची सांगता करण्यात आली.
ज्या भागात या देशी दारूच्या दुकानाला परवानगी दिली त्याच्या काहीच मिटर अंतरावर पोस्ट ऑफीस, बस स्टॅन्ड, श्री शिवाजी विद्यालय, उत्तमचंद बगाडिया महाविद्यालय, डॉ. धांडे, डॉ. डव्हळे, डॉ कुलकर्णी, डॉ परदेशी यांचे दवाखाने इत्यादी समाजपयोगी कार्यव्यवहार करणाऱ्या सामाजिक संस्था वा कार्यालय आहेत. असा ठिकाणी देशी दारूचे दुकान म्हणजे भविष्यात शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची तयारी असल्याचे मत उपोषणकर्ते सय्यद अकील यांनी अधिकाऱ्या समक्ष नोंदविले.
येत्या दहा दिवसात योग्य कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य आंदोलन केले जाईल असा इशारा सय्यद अकील तालुका अध्यक्ष व मोहम्मद आसिफ शहाराध्यक्ष यांनी दिला आहे. उपोषण सोडताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते प्रा.प्रशांत गोळे,विदर्भवादी नेते दत्तराव धांडे,शहर उपाध्यक्ष शेख खाजा, रासप जिल्हाध्यक्ष दीपक तिरके,अभिषेक सपकाळ, जहूर सर, सय्यद अस्लम,सुनील जुमडे इत्यादी उपस्थित होते.