देऊळगाव राजा (बुलढाणा)|३१ मार्च २०२६
जिल्ह्यात पुन्हा एकदा अफूची शेती आणि ड्रग्स कारवाई चर्चेत आली आहे. LCB आणि अंढेरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत कांद्याच्या शेतात लपवून ठेवलेली अफूची बेकायदेशीर शेती उघडकीस आली असून तब्बल ४४ लाख ५० हजार रुपयांचा अफू साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शेतकरी संजय तुकाराम चेके याला अटक करण्यात आली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या कारवाईत एकूण १ क्विंटल ११ किलो अफू जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील किंमत सुमारे ४४.५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेत नायब तहसीलदार साहिल जाधव, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे आणि LCB पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संयुक्त कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थांच्या शेतीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.
यापूर्वीही चिखली तालुक्यात अशाच प्रकारची कारवाई झाली होती. त्यामुळे देऊळगाव राजा आणि चिखली परिसरात अमली पदार्थांची छुपी शेती वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून पुढील काळात अशा कारवाया वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवैध धंद्यांवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
👉 ही बातमी शेअर करा आणि आपल्या परिसरातील अपडेट्स सर्वांपर्यंत पोहोचवा.
संबंधित बातम्या











