तलवारी ऐवजी हातात भारतीय संविधान आता भारतात अंधा कानून नसेल न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली…आपण चित्रपटांमध्ये न्यायालयीन दृश्यात न्यायदेवतेची मूर्ती बघितलेली आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते तर तिच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार दाखवलेली असते. असे म्हणतात की, न्यायदेवता निष्पक्षपणे न्यायदान करते म्हणून तिच्या डोळ्यांवर पट्टी असते. परंतु पुराव्यांअभावी पीडितांना न्याय मिळाला नाही तर ‘न्यायदेवता आंधळी’ असते, असे उपाहासाने म्हणतात. मात्र नव्या भारतातील न्यायदेवतेचे डोळे उघडले असून आता हातात तलवारीऐवजी राज्यघटना आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निर्देशांवरून सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या पुस्तकालयात असलेली न्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आली आहे. टोल्यांतर पटी असलेली न्यायदेवता ही ब्रिटिश वसाहतवादाची ओळख आहे. मात्र यामध्ये बदल होण्याची गरज सरन्यायाधीशांनी व्यक्त केली होती. न्यायदेवता कधीही आंधळी असू शकत नाही. तिच्या दृष्टीने सर्व समान आहेत तसेच तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे. न्यायालय हिंसेचे समर्थन करत नाही, तर घटनात्मक कायद्यांनुसार न्यायदान करते. त्यामुळे न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी राज्यघटना असणे अधिक योग्य आहे, असे सरन्यायाधीशांचे म्हणणे आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या पुस्तकालयात नवी मूर्ती लावण्यात आली आहे.