बुलढाणा जिल्ह्यातील तलाठ्यांचा पराक्रम..शेतकरी दाखवून 70 लोकांच्या खात्यात अतिवृष्टीचे 55 लाख लाटले. दोन तलाठ्यांसह ऑपरेटरवर गुन्हा दाखल.

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील तलाठ्यांचा पराक्रम, शेतकरी दाखवून लाटले 55 लाख रुपये. शासकीय नोकरीवर असतानाही शासकीय मदतीचा अपहार करण्यासाठी भूमिहीन आणि शेतमजुरांच्या नावे जमीन दाखवत बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर संबंधितांना अल्प वाटा देत ती रक्कम खातेदारांकडून परत घेतल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आला .

 

शेती नसलेल्या ७० लोकांना शेतकरी दाखवून त्यांचे खात्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले ५५ लाख रुपये वळते केल्याप्रकरणी तहसीलदार शितल सोलाट यांनी दिलेल्या तक्रारी नुसार संबंधित २ तलाठी व एक ऑपरेटर यांचे विरुद्ध गुन्हे दाखल झाल्यामुळे महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. २० जुलै २०२३ रोजी जळगाव जामोद तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराने शेतकरी व नागरिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले होते.

 

त्यावेळी अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या निधीत तलाठ्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी दाखवून सरकारी नुकसान भरपाई लाटण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदार शितल वैभव सोलाट यांनी ७ ऑगस्ट संध्याकाळी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गजानन बिल्लेवार तलाठी रा. शेगाव रोड महावितरण कार्यालयासमोर खामगाव, अनंत श्रीराम माठे तलाठी रा. रानअंत्री तालुका चिखली ह. मु. बस स्टँड च्या मागे जळगाव जामोद, महादेव संतोष पाटील वय २७ वर्ष सी एस सी चालक रा. जळगाव जामोद, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.