सिंदखेड राजा | १७ जानेवारी २०२६
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच या सिंचन तलावातील अर्ध्यापेक्षा अधिक पाणीसाठा अवैधरित्या उपसा करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिल्यास तलाव पूर्णपणे कोरडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. हा तलाव परिसरातील गुराढोरे तसेच शेतीतील विहिरींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
तलावात पाणी उपलब्ध असल्यास आजूबाजूच्या विहिरींच्या पाणीपातळीला आधार मिळतो. मात्र तलाव कोरडा पडल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते हानिप बागवान यांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
तक्रारीनंतर ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड यांनी प्रत्यक्ष तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी तलावात टाकण्यात आलेल्या मोटारपंपांची नोंद घेण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांची नावे लिहून घेण्यात आली आहेत. ही माहिती पुढील कारवाईसाठी महसूल व सिंचन विभागाला देण्यात आली आहे.
दरम्यान, सिंचन विभागाने कडक भूमिका घेत दोन दिवसांत अवैध मोटारपंप काढून घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मुदतीत मोटारी न काढल्यास महसूल विभाग, ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनीच्या संयुक्त कारवाईतून मोटारपंप जप्त करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मलकापूर पांग्रा येथील सिंचन तलावातून अवैध पाणी उपसा सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लघु पाटबंधारे सिंचन विभागाच्या अभियंता विशाखा सावंग यांनी उपविभागीय अभियंता देविदास केंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थळ पाहणी केली. शेतकऱ्यांना दोन दिवसांत मोटारपंप काढण्याचा इशारा देण्यात आला असून, अन्यथा संयुक्त कारवाईत मोटारपंप जप्त करण्यात येणार आहेत.
📩 Email: editor@kattanews.in
Related News













