lonar sarovar : जगप्रसिद्ध लोणार सरोवर lonar lake परिसरातील घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, वन विभाग आणि भारतीय पुरातत्त्व विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. यापुढे सरोवर परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचे आधारकार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. आधारकार्डची झेरॉक्स दिल्यानंतरच पर्यटनस्थळी प्रवेश मिळेल. आधारकार्डद्वारे परिसरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची स्वतंत्र नोंद केली जाणार आहे.
परभणी parbhani जिल्ह्यात असलेल्या सेलू तालुक्यातील रहिवासी ‘अर्जुन रोडगे’ arjun rodge यांचा सरोवर परिसरातील घनदाट जंगलात २ ऑगस्ट रोजी खून झाला होता. त्यापूर्वीही अनेक अप्रिय घटना सरोवर परिसरातील घनदाट जंगलात घडलेल्या आहेत. खुनाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी वन्यजीव आणि पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलिस ठाण्यामध्ये बोलावून त्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यापूढे धार गेटवरून आधारकार्डशिवाय आत प्रवेश देण्यात येऊ नये, प्रत्येकाच्या आधारकार्डची झेरॉक्स व मोबाइल नंबर नोंदविला जावा, विनाआधारकार्ड कोणी बळजबरीने आत जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिस ठाण्याला देण्यात यावी, अशी सूचना पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी केली. त्यासोबतच परिसरात गेलेला व्यक्ती परत आला किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी सरोवरात जाणाऱ्या व्यक्तीला नोंदणी केल्यानंतरटोकन देण्यात येईल व परत येताना दिलेले टोकन जमा करावे लागणार आहे, अशा सूचना या बैठकीत लेखी स्वरूपात देण्यात आल्या. या बैठकीला लोणार सरोवर परिसरातील बीट जमादार संतोष चव्हाण, संजय जाधव, अनिल शिंदे, पुरातत्त्व विभागाचे एमटीएस मनीष कुमार, प्रिन्स कुमार, अनिल फोलाने, राम मादनकर आदी उपस्थित होते.
धारेवरील पोलिस चौकीचा शुभारंभ कधी?
दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची दखल घेत पोलिस प्रशासन, पुरातत्त्व विभाग आणि वन्यजीव विभाग अधिक सतर्क झाले आहे. या पुढे पर्यटनस्थळी अशा घटना घडू नये यासाठी तातडीने बैठक घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, धारेवर दोन महिन्यांपासून सुरू केलेली पोलिस चौकी मात्र अजूनही बंद आहे. ती सुरू करण्यासाठी पोलिस प्रशासनाला कधीचा मुहूर्त सापडणार? असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे.