(गंगाधर बोरकर) Kattanews network :-
Ladli behna yojana maharashtra : विधानसभा निवडणुकीपूर्वी ५० टक्के मतदार असलेल्या राज्यातील महिलावर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारने राज्याची तिजोरी खुली केली आहे. वित्तमंत्री अजित पवार ajit pawar यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली.
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजना जाहीर करण्यात आल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी जाहीर केलेल्या ‘लाडली बहेना’ ladli behna yojana योजनेचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला होता. त्याच धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार असून, त्यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून लगेच म्हणजे जुलै २०२४ पासून केली जाणार आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट असून हे उत्पन्न आधार कार्डशी लिंक हवे.
बचत गटाच्या निधीत वाढ
राज्यात ६ लाख ४८ हजार महिला बचत गट असून, ही संख्या ७ लाख करण्यात येणार आहे. बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत २५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
वर्षाकाठी मिळणार ३ मोफत सिलिंडर
■ पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
■ पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्यांनाच वर्षाला तीन मोफत सिलिंडर मिळतील.
■ राज्यातील तब्बल ५२ लाख २६ हजार ४१२ कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.
पिंक ई-रिक्षा योजना
■अंतरिम अर्थसंकल्पात महिलांच्या स्वयंरोजगारनिर्मितीसाठी जाहीर केलेल्या ‘पिक ई-रिक्षा’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात १७ शहरातील १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाह्य केले जाणार आहे. या योजनेसाठी ८० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
■ याबरोबर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून वाढवून २५ हजार रुपये करण्यात आले आहे.
■राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असून त्यासाठी ७८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद घोषित करण्यात आली आहे.