jalna news : जालना जिल्ह्यातील वाटूर येथून जवळच असलेल्या जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी महामार्गावरील गट नंबर १४ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव येथील प्रेमीयुगुलाने लिंबाच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली. कैलास गवई आणि मुक्ता खंडागळे (दोघेही रा. रांजणगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही विवाहित असून त्यांना अपत्य असल्याची चर्चा होती.
मौजपुरी पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविले आहेत. हे दोघेही मोटारसायकलने (क्र. एमएच २० बीएफ ३६३८) शिंगाडे पोखरी शिवारात आले होते. शुक्रवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतमालक चंद्रकांत म्हेत्रे यांच्या शेतात दोघे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. म्हेत्री यांनी तत्काळ जालना jalna news मंठा रोडवर पेट्रोलिंग करणाऱ्या जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांना घटनेची माहिती दिली.
जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मौजपुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, मौजपुरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात पाठवले होते. प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.