Jalna crime latest news : शहरातील चंदनझिरा chandanzira भागातील एमआयडीसी भागात गुरुवारी रात्री एका युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणात दोघांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी नातेवाइकांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता.
‘सय्यद नदीम सय्यद रहीम’ (वय २६, रा. सुंदरनगर, चंदनझिरा) असे मयताचे नाव आहे. सय्यद नदीम हा गुरुवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरहून जालन्यात आला होता. सायंकाळी तो दुचाकी घेऊन बाहेर गेला होता. परंतु, रात्री चंदनझिरा भागातील अथर्व हॉटेलजवळील निसारभाई बिल्डिंगजवळ सय्यद नदीम याचा मृतदेह आढळल्याची माहिती वडील सय्यद रहीम सय्यद उमर यांना मिळाली. नातेवाइकांनी जाऊन पाहिल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणात मयताचे वडील सय्यद रहीम सय्यद उमर यांच्या तक्रारीवरून रवी शिवनाथ गवारे, विठ्ठल उर्फ माऊली बालासाहेब बोंबले (दोघे रा. चंदनझिरा) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी चंदनझिरा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी माघार घेतली. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दोघांना पाच दिवसांची कोठडी
या प्रकरणात अटक असणाऱ्या रवी गवारे, विठ्ठल बोंबले यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्या दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोनि, समर्थसिंग राजपूत यांनी सांगितले.