मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील शाळा, कॉलेजच्या ५०० मिटरच्या परिसरात खुल्या पद्धतीने कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणण्याबाबत सदस्य सत्यजीत तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. मंत्री आत्राम म्हणाले, अन्न पदार्थांमध्ये कॅफेन या घटक पदार्थांचे प्रमाण निश्चित केले आहे. तपासण्यासाठी नियमितपणे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले जातात. त्यानुसार, राज्यात एप्रिल २०२३-मार्च २०२४ या कालावधीत १६२ नमुने विश्लेषणासाठी घेतले. त्यातील ५३ प्रमाणित झाले. अप्रमाणित असलेला १८०० लिटर साठा पकडला आहे.