मालेगाव प्रतिनिधी – जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव (ता.३०) :बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठीचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. शासनाकडून योग्य तो निर्णय न घेतल्याने आज समाजबांधवांनी अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आणि हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करून तीव्र संताप व्यक्त केला.
दुपारी १ ते २.३० या वेळेत झालेल्या या आंदोलनात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. समृद्धी महामार्गावर तब्बल २० मिनिटांसाठी वाहतूक ठप्प झाली, तर अकोला–हैदराबाद महामार्गावर दीड तासापर्यंत वाहनांची रांग लागली होती.
हे पण वाचा.
मालेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० ते ६०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असूनही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना यश आले.
बंजारा समाजाची मागणी
हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. यासाठी राज्यभर गेल्या महिन्यात तब्बल ५६ मोर्चे काढण्यात आले होते.
मात्र, शासनाने अजूनही ठोस निर्णय घेतला नसल्याने आजच्या आंदोलनातून समाजाने आपला रोष व्यक्त केला.
या रास्ता रोको आंदोलनात पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज, महंत संजय महाराज, बंजारा क्रांती दलाचे कांतीलाल नाईक, तांडा सुधार समितीचे सचिव नाना बंजारा, धाडी समाजाचे अध्यक्ष राजू रत्ने, प्रा. अनिल राठोड, साहित्यिक डॉ. विजय जाधव, डॉ. सचिन पवार, श्रावण जाधव, सेवाराम आडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जर लवकरच बंजारा समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, तर राज्यभर अधिक मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल.”
महामार्गावर गर्दी वाढत असल्याने वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली. काही वेळानंतर आंदोलकांनी शांततेने महामार्ग मोकळा केला आणि शासनाला निवेदन दिले.
बंजारा समाजाचा हा आंदोलनाचा निर्धार पाहता, राज्य सरकारकडून यावर लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.










