पोळ्याच्या सणाला तरुणाने नदीत उडी घेताच नदीच्या प्रवाहात गेला वाहून.

 

 

किशन काळे,रिसोड /प्रतिनिधी 

 

ऐन पोळ्याच्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार  येथील अडाण नदीच्या पात्रात  ३० वर्षीय युवकाने उडी घेतली असता तो युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना २ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या युवकाचा शोध सुरू असून, रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

 

 

पोळ्याच्या सणाला  सोमवारी (दि.२) गावातील नागरिक, काही युवक पोळा साजरा करण्यासाठी स्थानिक अडाण नदी पात्राजवळ जमले होते. त्यावेळी येथील सागर ऊर्फ गोलू अरुण प्रधान (वय ३०) याने पुलावरून नदीपात्रात उडी मारली. यावेळी तो नदीपात्रात पोहत असल्याचे उपस्थितांच्या प्रथमदर्शनी लक्षात आले; परंतु काही वेळातच हा युवक पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दिसले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी बचावासाठी प्रयत्न केले. परंतु, पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला.

 

 

या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाकडून दीपक सदाफळे यांचे संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकास सूचना दिल्या. मात्र, रात्र झाल्याने शोधमोहीम मंगळवारी (दि. ३) सकाळी राबविली जाणार आहे. घटनास्थळी तहसीलदार शीतल बंडगर, नायब तहसीलदार ढोबळे, तलाठी तुकाराम गावंडे, पोलिस उपनिरीक्षक दिनकर राठोड, पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी भेट दिली.