डोणगाव |माधव भांदुर्गे
संभाजीनगरला जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या व्यक्तीने आशीर्वाद देण्याच्या निमित्ताने खिशातील पैसे काढल्याची घटना डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या प्रकारात नेतंसा येथील राजू मिठ्ठूलाल ओसवाल यांचे १० हजार १०० रुपये गायब झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी डोणगाव पोलिसांकडे तक्रार दिली असून, महाराजाच्या वेशातील संशयित व्यक्तीसह चारचाकीतील दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
राजू ओसवाल हे घराच्या बांधकामासाठी सिमेंट आणण्याकरिता आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीने डोणगावकडे जात होते. सकाळी साधारण १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान वाशिम जिल्ह्याची हद्द ओलांडून बुलढाणा जिल्ह्यातील मदरशाजवळ ते लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी मागून आलेली काळ्या रंगाची चारचाकी त्यांच्या जवळ थांबली. त्यातील व्यक्तींनी संभाजीनगरला जाण्याचा मार्ग विचारला.
लघुशंका आटोपल्यानंतर ओसवाल यांनी रस्ता सांगण्यासाठी चारचाकीजवळ जाऊन माहिती दिली. गाडीमध्ये दोन व्यक्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यापैकी एक जण वाहन चालवत होता, तर दुसऱ्या व्यक्तीने अंगाला भस्म लावले होते आणि डोक्यावर भगव्या रंगाची पगडी घातली होती. तो महाराजाच्या वेशात बसलेला होता.
रस्त्याची माहिती दिल्यानंतर या व्यक्तीने ओसवाल यांच्या डोक्यावर हात ठेवून चेहऱ्यावरून हात फिरवला. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने त्याने त्यांच्या खिशात हात घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. खिशातून पैसे काढले जात असल्याचे लक्षात येताच ओसवाल यांनी संबंधित व्यक्तीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी त्यांना चक्कर आल्यासारखे झाले आणि डोळ्यांसमोर अंधारी आल्याने ते खाली बसले.
काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर संबंधित काळी चारचाकी घटनास्थळावरून निघून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. खिशात ठेवलेले १० हजार १०० रुपयेही गायब असल्याचे दिसून आले. आशीर्वादाच्या बहाण्याने आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
डोणगाव येथे राजेंद्र पळसकर यांच्या कार्यालयासमोर त्यांना एक पोलीस कर्मचारी दिसला. ओसवाल यांनी त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना मेहकर रोडवरील पुलापर्यंत नेले; मात्र संशयित चारचाकी तेथे आढळली नाही. अखेर ओसवाल यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी त्यांची लेखी जबानी नोंदवून घेतली असून, पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून संशयित वाहन आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्तींकडून रस्ता विचारणे, मदतीच्या किंवा आशीर्वादाच्या बहाण्याने जवळ येणे अशा प्रसंगांत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. डोणगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करून संशयितांचा शोध कधी लावतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांसाठी आवाहन : अशा प्रकारे अनोळखी व्यक्ती संशयास्पद पद्धतीने जवळ येत असल्यास सावध राहा. कोणालाही आपल्या खिशातील किंवा मौल्यवान वस्तूंना हात लावू देऊ नका. संशयास्पद वाहन किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना माहिती द्या.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम मिळवा!
आपल्या गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी Katta News च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
हेही वाचा
- देऊळगाव राजा शहरात भरदिवसा चोरी; आधार अपडेट करण्यासाठी दुकानात गेले अन् दुचाकीच्या डिक्कीतून १.८० लाख लंपास!
- पुलवामा प्रकरणाचा बनाव, पोलीस असल्याची बतावणी अन् अटकेची धमकी; देऊळगाव राजातील निवृत्त बँक व्यवस्थापकाला १४ लाखांचा गंडा!
- मेहकर तहसीलच्या पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट! रेशन कार्डच्या नावाखाली नागरिकांची लूट; CCTV तपासण्याची मागणी
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 https://kattanews.in/
Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!










