सिंदखेडराजा | समाधान सरकटे
नगरपरिषद प्रशासनाकडून प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सिंदखेडराजा नगरपरिषदेतील कंत्राटी व असंघटित सफाई कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने १७ नोव्हेंबरपासून नगरपरिषद प्रशासनाविरोधात ‘भिकमांगो व जेलभरो’ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी कामगार रस्त्यावर उतरले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
आंदोलन सुरू होऊनही नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. विशेष म्हणजे, आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या सफाई कामगारांना आंदोलनस्थळी स्वतःच जेवणाची व्यवस्था करून स्वयंपाक करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे कामगारांच्या परिस्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सफाई कामगारांना वेळेवर वेतन अदा करावे, शासकीय नियमानुसार सुट्ट्या द्याव्यात, किमान वेतन कायद्यानुसार वेतन निश्चित करावे, तसेच भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम संबंधित कामगारांच्या खात्यावर नियमित जमा करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय कामगारांना विमा संरक्षण, आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे, कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्याची कारवाई थांबवावी आणि यापूर्वी कामावरून कमी केलेल्या कामगारांना तातडीने पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
कामगार आपल्या मूलभूत हक्कांसाठी आंदोलन करत असताना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व चक्रधर पाटील देवसरकर (प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा), गणेशराव माने (राष्ट्रीय किसान मोर्चा), संजय सोनकांबळे (बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, मराठवाडा संघटक), तातेराव खाडे (भारतीय मूलनिवासी मोर्चा, हिंगोली जिल्हाध्यक्ष), रशीदभाई (असंघटित कामगार संघटना), राम मेहत्रे, गजानन मेहत्रे, डॉ. भीमराव मस्के, रमेश मस्के, गणेश खांडेबराड, दर्शन जाधव, समाधान खरात, सर्जेराव खरात, शिवाजी गायकवाड, प्रकाश गायकवाड, जिजाबाई पोळघट, सुनीता खांडेबराड, शारदा जाधव, लिलाबाई कांबळे आदींनी केले.
या आंदोलनात महिला व पुरुष सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता सिंदखेडराजा नगरपरिषद प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!
📰 हे देखील वाचा
लग्नाच्या दोन दिवसांत नवरी गायब! तरुणाला गंडवून फरार झालेल्या महिलेला पोलिसांनी असे पकडले
सिंदखेडराजा नगरपरिषद आणि बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक घडामोडींच्या अपडेटसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.










