हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजात मंत्रिमंडळाची विशेष बैठक घ्या; जिजाऊंच्या जन्मभूमीच्या विकासासाठी वैशाली नागवडेंचा आग्रह

On: September 9, 2026 6:45 AM
Follow Us:
सिंदखेडराजात मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्याची मागणी करताना वैशाली नागवडे

सिंदखेडराजा : समाधान सरकटे 

राष्ट्रमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजाच्या विकासाला अधिक गती मिळावी, यासाठी येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी केली आहे. ६ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळांचा जसा विकास झाला, त्याच धर्तीवर जिजाऊंच्या जन्मभूमीचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

बुलढाणा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथे ज्या पद्धतीने मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्याच धर्तीवर जिजाऊंच्या भूमीतही राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आपण विशेष महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून आग्रह धरणार असल्याचे वैशाली नागवडे यांनी स्पष्ट केले.

सिंदखेडराजा ही स्वराज्याच्या इतिहासाशी जोडलेली महत्त्वाची भूमी आहे. त्यामुळे या परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः सिंदखेडराजा येथे येऊन विकासकामांची पाहणी केली होती, याचीही त्यांनी पत्रकार परिषदेत आठवण करून दिली.

मात्र, विकासकामांचा वेग मंदावला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विकासकामांसाठी मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करून त्यांना गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक सिंदखेडराजा येथे उत्साहात पार पडल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैशाली नागवडे यांनी सिंदखेडराजाच्या ऐतिहासिक महत्त्वासोबतच मुलींचे घटते प्रमाण आणि महिला सुरक्षेच्या विषयावरही भूमिका मांडली.

‘बेटी बचाव’सोबत जिजाऊंचा इतिहास अभ्यासक्रमात आणा

राजे लखुजीराव जाधव यांच्या पोटी जिजाऊंसारख्या कर्तृत्ववान कन्येचा जन्म झाला. पुढे जिजाऊंच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला दिशा मिळाली. या ऐतिहासिक वारशाचा संदर्भ देत मुलींच्या महत्त्वाबाबत समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याची गरज असल्याचे वैशाली नागवडे यांनी सांगितले.

आजच्या काळात ‘बेटी बचाव’ ही संकल्पना राबवण्यासाठी शासन आणि समाजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. जिजाऊंच्या जन्माचा आणि त्या काळातील मुलींच्या महत्त्वाचा संदर्भ देणारे विशेष धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

जिजाऊंचा इतिहास विद्यार्थ्यांना केवळ ऐतिहासिक माहिती म्हणून न शिकवता त्यातून मुलींबाबत सकारात्मक आणि सामाजिक संदेश देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सिंदखेडराजाच्या विकासासोबतच जिजाऊंच्या विचारांचा आणि इतिहासाचा शालेय शिक्षणात समावेश करण्याचा मुद्दाही त्यांनी पुढे आणला.

या पत्रकार परिषदेला आणि आढावा बैठकीला आमदार मनोज कायंदे, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षा माधुरी शिपणे, माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी युवक जिल्हाध्यक्ष शेख यासीन, राष्ट्रवादीचे युवा नेते नितीन कायदे, शंतनु बोंद्रे, मनोज दांडगे, सरस्वती खासणे, शहराध्यक्ष वैभव मीनासे, नगरसेविका हजरा काझी, श्रेया खरात, आवेज खान, कैलास म्हस्के, सारिका मेहेत्रे, शेख अजीम, अरेफ चौधरी, शेखर बोंद्रे, सदाशिव मुंडे, सुनील शेजुळकर, भूषण दाभाडे आणि दीपक चेके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमचे मत काय?

जिजाऊंच्या जन्मभूमीत राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित केल्यास सिंदखेडराजाच्या विकासाला अधिक गती मिळू शकते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

📢 KattaNews सोबत जोडलेले रहा

बुलढाणा, सिंदखेडराजा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानिक घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी KattaNews वाचत रहा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment